दोन हजार शाळांची वाजणार घंटा विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 05:00 AM2021-09-26T05:00:00+5:302021-09-26T05:00:56+5:30
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ज्ञानाची दारे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी होणार दिला असून, आता शाळांमध्ये विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेतील, असा निर्णय झाला आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन बंधनकारक आहे. सध्या ग्रामीण भागात माध्यमिकच्या सुमारे ३०० शाळा सुरू आहेत. शहरात दहावीचे वर्ग घेण्यात येत असले तरी पालकांच्या मनात भीती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शाळा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या शाळातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ज्ञानाची दारे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी होणार दिला असून, आता शाळांमध्ये विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेतील, असा निर्णय झाला आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन बंधनकारक आहे. सध्या ग्रामीण भागात माध्यमिकच्या सुमारे ३०० शाळा सुरू आहेत. शहरात दहावीचे वर्ग घेण्यात येत असले तरी पालकांच्या मनात भीती होती. परंतु आता शासनाने शहरात आठवी ते बारावी, तर ग्रामीणमध्ये पाचवी ते बारावीपर्यंत नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील, असे स्पष्ट केले आहे.
पाचवी ते बारावीपर्यंत ३ लाख ३७ हजार ७८९ विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याने दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिकच्या २८९४ शाळा असल्याची माहिती आहे.
शहरी भागात हल्ली शाळा सुरू होण्याचे प्रमाण शून्य होते. मात्र, शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्या दिशेने तयारी केली जाईल. पालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील शाळांमध्ये ८ ते १२ वर्ग सुरू होते.
- ई.झेड. खान शिक्षणाधिकारी