धक्कादायक! अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपेत चिरला दोघांचा गळा; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 10:31 AM2022-09-16T10:31:22+5:302022-09-16T11:27:17+5:30

‘डबल मर्डर’ : लोणी ठाण्यात गुन्हा दाखल

Two throats were slit in their sleep in the Dargah premises in Amravati | धक्कादायक! अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपेत चिरला दोघांचा गळा; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

धक्कादायक! अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपेत चिरला दोघांचा गळा; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

googlenewsNext

अमरावती : बडनेरा-अकोला मार्गावरील पाळा गावाजवळील दडबडशाह दर्ग्याच्या आवारात झोपलेल्या दोघांची शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी सकाळी ‘डबल मर्डर’ची ही खळबळजनक घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळ नेमके कुणाच्या हद्दीत, हा तिढा निर्माण झाला.

पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांनीदेखील घटनास्थळ गाठले. अखेर घटनास्थळ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले. लोणी पोलिसांनी दुपारी या डबल मर्डरबाबत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अन्वर बेग अकबर बेग (५५, रा. लालखडी) व शेख तौसिफ अब्दुल रफीक (२५, रा. कारंजा) अशी मृतांची नावे आहेत.

पोलीस तक्रारीनुसार, अन्वर बेग व शेख तौसिफ हे दोघेही पाळा गावाजवळ असलेल्या दडबडशाह दर्ग्यात वास्तव्यास होते. बुधवारी रात्री दोघेही दर्ग्याच्या आवारातच झोपले होते. झोपेत असतानाच अज्ञातांनी अन्वर बेग व शेख तौसिफ या दोघांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर मारेकरी पसार झाला. दरम्यान, गुरुवारी सकाळी अन्वर बेग व शेख तौसिफ या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दर्ग्यात आलेल्या नागरिकांना दिसून आले.

घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. माहिती मिळताच बडनेरा व सोबतच लोणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ नेमके कुणाच्या हद्दीत, यावर बराच खल झाला. बडनेरा पोलिसांनीच घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. त्यापूर्वी आरोपी अटक होईपर्यंत शवविच्छेदन करण्यास मृताच्या कुटुंबीयांनी नकार दिला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोडविला तिढा

घटनेबाबत माहिती मिळाल्यावर अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सुरुवातीला घटनास्थळ बडनेरा ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, लोणी येथील सरपंचांनादेखील पाचारण करण्यात आले. सरपंचांनी मांडलेली भूमिका व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सुसंवादानंतर घटनास्थळ हे लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समोर आले. त्यानुसार लोणी पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

अशी झाली घटना उघड

मुजावर अन्वर शाह हा गेल्या काही वर्षांपासून तेथे सेवक म्हणून काम करीत होता, तर अब्दुल तौसिफ हा ट्रक क्लिनर होता. दर्गाह आवारातील एका हॉलमध्ये ते दोघेही पोलिसांना मृतावस्थेत आढळून आले. दर्ग्यालगतच्या शेतात गुरुवारी सकाळी काही मजूर फवारा मारण्यासाठी गेले होते. तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी दर्ग्यात गेले असता त्यांना या दोघांचे मृतदेह दिसून पडले. मृतकाच्या छातीवर, गळ्यावर तसेच तोंडावर वार असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. घटनेमागील कारण अद्याप समोर आले नाही. घटनास्थळी पोलिसांना कुठलेही शस्त्र सापडले नाही. दर्ग्यातील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली. अब्दुल तौसिफ हा कामानिमित्त बाहेरच असायचा. तो तीन महिन्यांपासून घरी आलेला नव्हता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.

दुहेरी हत्याप्रकरणी लोणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. ग्रामीण गुन्हे शाखेच्या तीन व लोणी पोलिसांच्या दोन चमू आरोपींच्या शोधार्थ बनविल्या गेल्या आहेत. आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

- अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती

Web Title: Two throats were slit in their sleep in the Dargah premises in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.