कालव्याने मातेच्या काळजाचा ठोका चुकविला.., अंगण झाले सुने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 10:46 AM2023-11-08T10:46:21+5:302023-11-08T10:47:15+5:30
मुहीफाटा येथील दोन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार
परतवाडा (अमरावती) : पक्ष्यांची जशी किलबिल तशी दोन परिवारांच्या घरांपुढील अंगणात डोळ्यांसमोर रडत, खेळत, बागडत असणाऱ्या काळजाच्या तुकड्यांचा आवाज आता कायमचा बंद झाला आहे. एका अनाहूत घटनेत वझ्झर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुहीफाटा येथील दोन चिमुकले धरणाच्या मुख्य कालव्यात खेळताना पडून दोघांचाही मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. रात्री सात वाजेच्या दरम्यान एकाचा तर मंगळवारी सकाळी दहा वाजता दुसऱ्याचा मृतदेह शोधमोहीम करणाऱ्या पोलिस आणि गावकऱ्यांना आढळून आला. दोघांवर उपजिल्हा रुग्णालयात आणून नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अचलपूर येथील मूहीफाटा येथील आयुष गणेश बेटे (वय दोन वर्षे), आरुष मिनेश बेटे (वय दीड वर्ष) दोघेही चिमुकले खेळताना सोमवारी सायंकाळी चार वाजता धरणाच्या मुख्य कालव्यात पडले. धरणाचा पाणीपुरवठा कालव्याद्वारे सोडला जात नसला तरी पावसाचे पाणी तीन फुटापेक्षा अधिक भरले आहे. कालव्यात पडल्यानंतर दोघांचाही या कालव्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला. सायंकाळी सहा वाजता बेपत्ता झालेल्या चिमुकल्यांचा शोध नातेवाईक घेत होते आणि सगळ्यांना एकच धक्का बसला.
धरणाच्या कालव्यात दोन चिमुकले बुडाले; एकाचा मृतदेह सापडला
कालव्यात एक मृतदेह आढळून आल्याने दुसऱ्याचीही शोधमोहीम सुरू झाली. तत्काळ परतवाडा पोलिसांना माहिती दिली गेली. ठाणेदार संदीप चव्हाणसह पीएसआय विकास रोकडे, चंद्रकांत बोरसे, जमादार राजेश पटेल, गुळसुंदरे या कर्मचाऱ्यांसह निमदरीचे उपसरपंच अनिल आकोडे, पोलिस पाटील चांदूरकर, वझ्झरचे संजय बाराबे, शाम दहीकर, लक्ष्मण सावलकर, जीवन नागले, किसन कासदेकर, अनिल धांडे व गावकरी रात्रभर जागले वाहनांच्या टॉर्च व चार्जर लाईटने दुसऱ्या चिमुकल्याची शोधमोहीम राबविली. मंगळवारी सकाळी दहा वाजता दुसऱ्या चिमुकल्याचा वीस फूट अंतरावर मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर आता सुरक्षेच्या दृष्टीने तेथील आदिवासींनी सुद्धा आपल्या चिमुकल्यांसाठी दक्ष राहणे गरजेचे ठरले आहे.
पाण्यातील जीवांनी मृतदेह कुरतडला
धरणाच्या मुख्य कालव्यात एका चिमुकल्याचा मृतदेह शोधताना रात्रभर न सापडल्याने रात्रभर चिमुकल्याचा मृतदेह कालव्यातच पडून होता. सकाळी पोलिस व गावकऱ्यांना दिसून आला; परंतु तो मृतदेह खेकडे आणि पाण्यातील इतर जीवांनी कुरतडला होता.
नातेवाइकांचा टाहो, कोवळे जीव गेले
आपल्या जीवनातील काही दिवसच खेळत, बागडत जगणाऱ्या दीड आणि दोन वर्षांच्या या चिमुकल्यांचा अंत हृदयाला चटका देणारा ठरला आहे. दोन्ही चिमुकल्यांच्या आई-वडिलांसह परिजनांचा टाहो हृदयाला चटके देणारा ठरला जड अंतकरणाने त्यांनी या गोंडस चिमुकल्यांचा हसणे रडणे खेळणे बागडणे कायमचे बंद झाले.