तलावात बुडून दोन पर्यटकांना जलसमाधी, पर्यटनासाठी आले होते तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 07:22 PM2019-07-14T19:22:35+5:302019-07-14T19:24:00+5:30
पोहण्याच्या नादात गमावला जीव : नागपूर, वर्धा येथून आले होते फिरायला
चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरायला आलेल्या दोन पर्यटकांचा रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील सक्कर तलावात बुडून मृत्यू झाला. प्रणव भारत गोस्वामी (२३, रा. जरीपटका, नागपूर) व मंगेश रामभाऊ ठाकरे (२४, रा. आंबेडकर नगर, वर्धा) अशी मृतांची नावे आहेत.
वर्धा व नागपूर येथील आठ युवक फिरण्यासाठी आले होते. प्रणव व मंगेश हे दोघेही इतर मित्रांसोबत आंघोळीसाठी तलावात उतरले. त्यांचा गाळात फसून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले, तर दुसऱ्याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मनीष मेंढे, रोशन मारोती कागदे, सौरभ देवानंद खवले, चेतन ढोबळे हे तरुण नागपूर येथून एम एच ३९ पी ५९९३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरण्यासाठी आले होते. सर्व युवक पेंटिंग व इतर रोजंदारीचे कामे करीत असल्याचे सांगण्यात आले. रात्रीचा प्रवास करून पहाटे चिखलदºयात पोहोचले. त्यांनी सक्कर तलावात आंघोळीचा बेत आखला. आंघोळ करीत असताना प्रणव व मंगेश यांना पोहता येत नसल्यामुळे ते तलावातील गाळात फसले. त्यांना बाहेर निघता न आल्याने बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती उपस्थित नागरिकांसह पर्यटकांना दिली. मात्र, प्रयत्न निष्फळ ठरले. चिखलदरा पर्यटन स्थळावरील सक्कर तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. दरम्यान, प्रणय गोस्वामी या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे कार्य वृत्त लिहिस्तोवर सुरू होते.
अपघाताची मालिका, पर्यटकांचा हुल्लडपणा
चिखलदरा पर्यटन स्थळावर शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. काही पर्यटक हुल्लडपणा आणि पर्यटन स्थळावरील नियमाचे उल्लंघन करतात. त्यामुळे अशा अपघाताला ते बळी पडत असल्याचे वास्तव आहे. मागील आठवड्यात दर्यापूर येथील पर्यटकांची भारधाव कार येथील मालविय पॉइंटवर पुलाखाली कोसळून सात पर्यटक जखमी झाले होते. शनिवारी चिखलदाराहून परत जाणाºया वर्धा येथील पर्यटकांच्या वाहनाला आसेगावनजीक अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला.
सक्कर तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
- आकाश शिंदे, ठाणेदार, चिखलदरा पोलीस ठाणे