दोन रेल्वेगाड्यांना मिळाला शेगावचा थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:42 PM2019-02-02T14:42:48+5:302019-02-02T14:47:01+5:30
संतनगरी शेगावकरिता रेल्वे प्रशासनाने दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत मंजुरी प्रदान केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संतनगरी शेगावकरिता रेल्वे प्रशासनाने दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत मंजुरी प्रदान केली आहे. सहा महिन्यांकरिता प्रायोगिक तत्त्वावर एका मिनिटाकरिता हा थांबा देण्यात आला आहे. ३ फेब्रुवारीपासून त्यावर अंमलबजावणी होत आहे.
नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस (गाडी क्र. २२१३७) फेब्रुवारीपासून शेगावचा थांबा घेईल. रविवार, बुधवार, शनिवार या दिवशी दुपारी २.४४ ला ही एक्स्प्रेस शेगावला थांबेल आणि २.४५ वाज प्रस्थान करेल. परतीच्या प्रवासात ही एक्स्प्रेस (गाडी क्र. २२१३८) सोमवार, मंगळवार व शुक्रवारी पहाटे ५.३९ वाजता शेगावला थांबेल आणि ५.४० वाजता तेथून नागपूरकरिता निघेल.
रविवारी असलेली जोधपूर-चेन्नै एग्मोर एक्स्प्रेस (गाडी क्र. २२६६३) शेगावला ११.१४ वाजता पोहोचेल आणि ११.१५ वाजता जोधपूरकरिता रवाना होईल. ही एक्स्प्रेस (गाडी क्र. २२६६४) परतीच्या प्रवासात मंगळवारी सायंकाळी ७.५२ वाजता शेगावला थांबा घेईल आणि ७.५३ वाजता तेथून चेन्नैकरिता पुढील प्रवास करणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
एक्स्प्रेस रेल्वेगाडीच्या थांब्यामुळे शेगावची वारी करणाऱ्या, विशेषत: नोकरदार-व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही सेवा पुढेही सुरू राहावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.