मेळघाटातील घटांग घाटात दोन ट्रक उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:53 AM2019-07-07T00:53:13+5:302019-07-07T00:53:35+5:30
लगतच्या घटांग घाटात सततच्या पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर चिकन माती आल्याने दोन दिवसात दोन ट्रक उलटल्याची घटना शनिवारी उघड झाली. परतवाडा, घटांग, धारणी, इंदूर असा आंतरराज्य महामार्ग असून मागील आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : लगतच्या घटांग घाटात सततच्या पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर चिकन माती आल्याने दोन दिवसात दोन ट्रक उलटल्याची घटना शनिवारी उघड झाली.
परतवाडा, घटांग, धारणी, इंदूर असा आंतरराज्य महामार्ग असून मागील आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावली. रस्त्याच्या कडेवरील नाल्या साफ न केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आहे. ठिकठिकाणी माती व दरडीचा मलबा पडला आहे. या मार्गावर रात्रंदिवस मालवाहू जड वाहतूक सुरू राहत असल्यामुळे इंदूरहून हैदराबाद येथे गहू घेऊन जाणारा एमपी ०९ एचएच ९९१४ हा ट्रक शुक्रवारी रात्री बिहाली ते घटांग दरम्यान घाटात खराब रस्त्यामुळे अपघात होऊन उलटला. तर इंदूरवरून नागपूरकडे जाणारा एमएच ४० बीएल १२९६ क्रमांकाच्या ट्रकला खराब रस्त्याचा फटका बसून तो रस्त्याच्या कडेला उलटला. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर दुर्लक्ष केल्याने मालवाहू वाहनचालक-मालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
आठवडाभरापासून मेळघाटात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे घाटवळणावरील दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा तो मलबा हटविलेला नाही. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.