कारमधील ८० हजार रुपयांसह दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:29 AM2020-12-13T04:29:59+5:302020-12-13T04:29:59+5:30
अमरावती : नोकरानेच मालकाच्या कारमधील पिशवीतील ८० हजार व दुचाकी असा एकूण १ लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची ...
अमरावती : नोकरानेच मालकाच्या कारमधील पिशवीतील ८० हजार व दुचाकी असा एकूण १ लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना वडगाव माहोरे स्टोन इंडस्ट्रीजमध्ये शुक्रवारी घडली. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी शनिवारी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे येथे काम करणाऱ्या नोकरावर गुन्हा नोंदविला.
चेतन नामदेव नेवारे ( रा. कपिलेश्वर ता. आर्णी जि. यवतमाळ), असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अरुण डमडाजी पडोळे यांनी नांदगावपेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीससूत्रानुसार, फिर्यादी हे कार क्रमांक एमएच २७ बीएन- २१४ ने त्यांच्या स्टोन इंडस्ट्रीज वडगाव रोड येथे गेले होते. त्यांनी वाहन उभे केले. त्या वाहनात चालकाच्या सीटच्या बाजूने ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या पिशवीत पैसे ठेवून ते काम पाहण्यास गेले. परत येताच त्यांना पिशवीतील पैसे गायब झाल्याचे लक्षात आले. तेव्हा फिर्यादीने मॅनेजरकडे चेतनबाबत विचारणा केली. तेव्हा दुचाकी घेऊन गेल्याचे कळले. फिर्यादी यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता आरोपी कारचे दार उघडून पैशाची बॅग घेऊन जाताना दिसला. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३८१ नुसार गुन्हा नोंदविला.