नागरी वस्तीतून दुचाकी तीन किलोमीटर नेली फरफटत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:00 AM2021-06-16T05:00:00+5:302021-06-16T05:00:39+5:30
गुरुदेवनगरातील वाॅर्ड क्रमांक २ मध्ये वाशिम जिल्ह्यातील महेंद्र बापूराव बसवनाथे हे सहकुटुंब रोजगाराच्या निमित्ताने भाड्याने राहतात. त्यांची एमएच २९ एव्ही ८०३९ क्रमांकाची दुचाकी घराबाहेर उभी होती. बेफाम वेगाने आलेल्या एमएच २७ एसी ३१३९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने बसवनाथे यांच्या दुचाकीला धडक दिली, शिवाय पुढल्या भागात अडकलेली ही दुचाकी फरफटत नागरी वस्तीतून महामार्गावर आणली व अविश्वसनीयरीत्या तब्बल तीन किलोमीटर घासत नेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज (मोझरी) : गुरुदेवनगर येथे सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता नागरिकांसाठी चिंताजनक असा विचित्र अपघात घडला. नागरी वस्तीतून एका चारचाकी वाहनाने दुचाकी तीन किलोमीटरवर फरफटत नेली. नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडले.
गुरुदेवनगरातील वाॅर्ड क्रमांक २ मध्ये वाशिम जिल्ह्यातील महेंद्र बापूराव बसवनाथे हे सहकुटुंब रोजगाराच्या निमित्ताने भाड्याने राहतात. त्यांची एमएच २९ एव्ही ८०३९ क्रमांकाची दुचाकी घराबाहेर उभी होती. बेफाम वेगाने आलेल्या एमएच २७ एसी ३१३९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने बसवनाथे यांच्या दुचाकीला धडक दिली, शिवाय पुढल्या भागात अडकलेली ही दुचाकी फरफटत नागरी वस्तीतून महामार्गावर आणली व अविश्वसनीयरीत्या तब्बल तीन किलोमीटर घासत नेली. नागरीकांनी या वाहनाचा पाठलाग करून शेदोळा खुर्द येथील उड्डाणपुलानजीक पकडले. हे वाहन माहुली जहागीर येथील रहिवासी मो. फैजान अब्दुल कलाम (२६) हा चालवत होता, असे तिवसा पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या विचित्र अपघाताचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरला असून, या घटनेने गुरुदेवनगरवासी कमालीचे हादरले आहेत. नागरिकांची सुरक्षा दिवसाढवळ्या धोक्यात आल्याची गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली.