नागपूरातून अमरावती गाठत दुचाकी चोरी; चार अट्टल चोर जेरबंद
By प्रदीप भाकरे | Published: July 30, 2024 11:43 PM2024-07-30T23:43:47+5:302024-07-30T23:44:07+5:30
१५ दुचाकी जप्त, गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई.
अमरावती : अमरावती शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या नागपुरच्या चार सराईत चोरांना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. प्रणव संजय ठाकरे (२३), करण गणेश उके (१८, दोघेही रा. खामला, नागपूर), प्रणव सुरेश मारबते (२०, रा. हनुमाननगर, वानाडोंगरी, नागपूर) व ऋषिकेश रवी कुंबरे (१९, रा. जयताळा, नागपूर) अशी अटक चोरांची नावे आहेत.
शहरातील मंगलधाम परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथील रहिवासी सुमेध साळुंखे यांची दुचाकी घरासमोरील पार्किंगमधून लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी सुमेध साळुंखे यांनी ३० जून रोजी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट दोनही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात या गुन्ह्यात प्रणव ठाकरे याचा हात असल्याचे समोर आल्यावर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच साथीदार करण उके, प्रणव मारबते व ऋषिकेश कुंबरे यांच्यासोबत अमरावती व नागपूर येथून अन्य दुचाकी चोरल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार करण, प्रणव व ऋषिकेशलाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्यात.
यांनी केली कारवाई
ही कारवाई सीपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व सत्यवान भुयारकर, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, राजेंद्र काळे, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, चंद्रशेखर रामटेके, नीलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, अमर कराळे व संदीप खंडारे यांनी केली. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे.