कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 03:46 PM2022-04-19T15:46:28+5:302022-04-19T15:54:52+5:30
तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुऱ्हा (अमरावती) : कुऱ्हा ते कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार तर तीनजण जखमी झाले. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ८च्या सुमारास हा अपघात घडला.
पुरूषोत्तम नारायण गांधी (६०, रा. खरांगणा, ता. आर्वी, जि. वर्धा) व प्रवीण श्रीराम आडे (३५, रा. कारला, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) अशी अपघातातील मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत प्रवीण यांच्या आई सुभा श्रीराम आडे (५५ ), वंश प्रवीण आडे ( ७ वर्षे ) यशवंत प्रवीण आडे (५ वर्षे सर्व रा. कारला) हे तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रवीण आडे हे आई व दोन लहान मुलांसह जवळच्या मारडा गावात रविवारी झालेल्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. लग्न आटोपल्यानंतर एका दुचाकीवरून चौघे जण मारडा येथून कारला गावाकडे परत येत होते. कुऱ्हा ते कौंडण्यपूर मार्गावरील वळणावर चौफुलीसमोर विरूद्ध दिशेने येणारी दुचाकी वेगात असल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली. दोन्ही दुचाकींचा वेग अधिक होता. शिवाय दुचाकीवर चौघे असल्याने त्यांना वळणावर वेग कमी करता आला नाही. त्यामुळे दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडकल्या.
प्रवीण आडे, त्यांच्या आई व दोन लहान मुले असे चौघे एका दुचाकीवर, तर दुसऱ्या दुचाकीवर पुरूषोत्तम गांधी होते. पाचही जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पुरूषोत्तम गांधी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर जखमी प्रवीण आडे यांना पुढील उपचारासाठी पीडीएमसी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान प्रवीण आडे यांचाही दुपारी मूत्यू झाला, असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले. समोरासमोर अपघात झाल्याची माहिती कुऱ्हा पोलिसांना दुपारी दोनच्या सुमारास समजली. परंतु तक्रार नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे कुऱ्ह्याचे ठाणेदार संदीप बिरांजे यांनी सांगितले.