अमरावती जिल्ह्यात दोन वर्षांच्या बिबट्याला ‘पॅरालिसीस’, दोनही पाय निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 09:49 PM2020-11-26T21:49:30+5:302020-11-26T21:54:49+5:30
भानखेडा ते छत्री तलाव मार्गावरील कंवरधाम परिसरात खत्री यांच्या शेतात सुमारे दोन वर्षीय बिबट्याला पॅरालिसीस आल्याने वनविभागाच्या चमुने गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भानखेडा ते छत्री तलाव मार्गावरील कंवरधाम परिसरात खत्री यांच्या शेतात सुमारे दोन वर्षीय बिबट्याला पॅरालिसीस आल्याने वनविभागाच्या चमुने गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. बिबट्याचे दोनही पाय निकामी झाले असून, शरीर सुन्न पडल्याची माहिती आहे. हल्ली या बिबट्यावर वडाळी येथे पशू अधिकाऱ्यांच्या देखरेखीत उपचार करण्यात येत आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, भानखेडा- छत्री तलाव मार्गावरील दक्षिण वडाळी कंपार्टमेंट क्रमांक ८ अंतर्गत खत्री यांच्या शेतात दीड- ते दोन वर्षांचे बिबट सुन्न अवस्थेत दिल्याची माहिती गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानुसार वडाळी वनविभाग व रेस्क्यू पथकाची चमू घटनास्थळी पोहचली असता, बिबट्याच्या शरीराच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, मागील दोन्ही पाय निकामी झाल्याचे निरीक्षणांती लक्षात आले. त्यानंतर बिबट्याचे फिजिकल रेस्क्यू करण्यात आले. पशू वैद्यकीय अधिकारी हटवार यांनी घटनास्थळी पंचनामा केला. बिबट्याच्या अंगावर बाहेरील भागात कोणतीही जखम नव्हती. मात्र, मागील दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे बिबट्याला अर्धांगवायू आला असावा, असा अंदाज पशू वैद्यकीय अधिकारी हटवार यांनी वर्तविला. यावेळी वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर, वडाळीचे वनपाल एस.एन. देशमुख, वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे, डॉ. स्वप्निल सोनाेने आदी उपस्थित होते.
पशू वैद्यकीय अधित्ऱ्यांकडून बिबट्याची तपासणी करण्यात आली. नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू केंद्रात त्याला पुढील उपचारासाठी नेले जाणार आहे. बिबट्याला अर्धांगवायू आला असावा, असा अंदाज आहे.
- चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक, अमरावती