दोन तरुणांना जिवंत जाळण्याचा कट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 12:04 AM2017-02-27T00:04:56+5:302017-02-27T00:04:56+5:30
शिवजयंतीच्या मिरवणूकीत झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोन युवकांवर तलवार, चाकु व काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला.
मिरवणुकीतील वाद : गोपालनगर रस्त्यालगतची घटना
अमरावती : शिवजयंतीच्या मिरवणूकीत झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोन युवकांवर तलवार, चाकु व काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. तथा त्यांना जिवंत जाळण्याचा कट रचल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघड झाली. राजापेठ हद्दीतील गोपाल नगर रस्त्यावरील स्कुल आॅफ स्कॉलर्स शाळेच्या मागील परिसरात हा प्रकार घडल्याचे राजापेठ पोलिसांमध्ये नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राहुल सुनिल बाजड (३०, रा. गोपालनगर) व विशाल धनंजय बोबडे (२२, रा. नंदा मार्केटजवळ राजापेठ) अशी गंभीर जखमींची नावे आहे. गस्तीवरील पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
१९ फेब्रुवारीला काढण्यात आलेल्या शिवजयंती रॅलीदरम्यान राहूल बाजड व विशाल बोबडे यांचा काही तरुणांशी झेंडा हाती घेण्याच्या कारणावरून वाद झाला होता. तो वाद राजकीय पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने निवळला. दरम्यान रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास राहुल बाजड व विशाल बोबडे हे दोघेही गोपालनगर परिसरातील कुंभारवाड्याजवळ असणाऱ्या वैष्णवी मेडीकलजवळ उभे होते. तेव्हा आॅटोतून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू, तलवार, काठीने प्राणघातक हल्ला चढवला. संदीप बेहरे, अजय बेहरे, विक्रम बडवाईक व शिवा गावंडे (सर्व राहणार - आदर्शनगर) यांचा हल्लेखोरांमध्ये समावेश असल्याचे जखमींनी बयाणात म्हटले आहे.
समयसूचकतेने अनर्थ टळला
अमरावती : या हल्लेखोरांनी दोघांना काठीने बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने वारही केलेत. त्यामुळे दोघेही सैरावैरा पळाले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना पुन्हा पकडून मारहाण करणे सुरुच ठेवले. दरम्यान हल्लेखोरांनी राहुल व विशाल यांना आॅटोत कोंबून त्याच मार्गावरील स्कुल आॅफ स्कालर्स शाळेच्या मागील परिसरात नेले. त्या ठिकाणी त्यांना पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोर तेवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी आपल्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा बेत आखला होता, अशी खळबळजनक माहिती बोबडे आणि राजापेठ पोलिसांनामध्ये नोंदविलेल्या बयाणात दिली आहे.
काही तरुणांमध्ये मारहाण सुरू असल्याची बाब त्या मार्गावर गस्त घालणाऱ्या राजापेठ पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ सीआर मोबाईल वाहन घटनास्थळी नेले असता त्या हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणात धनंजय भालचंद्र बोबडे (५०,रा. नंदा मार्केटजवळ, राजापेठ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संदीप बेहरे, अजय बेहरे, विक्रम बडवाईक व शिवा गावंडेविरुध्द भादंविच्या कलम ३०७, ३६५, १२०(ब), ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. दरम्यान दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चारही आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडल्या जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी रविवारी दुपारी राजापेठ पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेतली.
शिवजयंतीच्या रॅलीत झेंडे हाती घेण्यावरून दोघांचा काही युवकांशी वाद झाला. त्या वादाचा वचपा काढण्याच्या हेतूने आरोपींनी दोघांचे अपहरण व त्यांचेवर हल्ला चढविला. तक्रारीवरून चार जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
- रामभाऊ खराटे, प्रभारी पोलीस निरीक्षक, राजापेठ पोलीस ठाणे.
शहरात ‘बिहार राज’
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असतानाही काही गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी शहरात ‘बिहार राज’चे वातावरण निर्माण केले आहे. गोपाल नगराजवळ घडलेल्या या घटनेत भर रस्त्यावर चार जणांनी दोन युवकाचे अपहरण करून त्यांचेवर प्राणघातक हल्ला चढविला. एवढेच नव्हे तर त्या दोघांना जाळण्यासाठी हल्लेखोरांनी सोबत रॉकेल सुध्दा आणल्याचे जखमींनी त्यांच्या बयाणात म्हटले आहे. त्यामुळे शहरात ‘बिहार राज’ अवतरले की काय, अशी भीती व्यक्त केल्या जात आहे.