नांदगावात टायफाईडची साथ
By admin | Published: March 24, 2016 12:42 AM2016-03-24T00:42:21+5:302016-03-24T00:42:21+5:30
सकाळचा गारवा, दुपारी ऊन, अन रात्री उकाडा अशा वातावरणातील बदलामुळे शहरवासियांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.
आबालवृध्द बेजार : खासगी दवाखाने हाऊसफुल्ल, वातावरणातील बदलाचा परिणाम
नांदगाव खंडेश्वर : सकाळचा गारवा, दुपारी ऊन, अन रात्री उकाडा अशा वातावरणातील बदलामुळे शहरवासियांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत टायफाईडची लागण झाली असून येथील ग्रामीण रूग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. लहान मुले देखील डायरियाने त्रस्त झाली आहेत. दूषित पाण्यामुळे हे आजार बळावत असल्याचे चित्र आहे.
मागील महिन्यापासून नांदगाव शहरात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ग्रामीण रुग्णालयातील माहे फेब्रुवारीची आकडेवारी बघता दैनंदिन १७५ ते २०० रुग्णांची नोंद करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये एकाच महिन्यात तब्बल ५५०० रूग्णांवर विविध आजारांसाठी औषधोपचार करण्यात आलेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टायफाईडची लागण झाली असून आता मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्व रुग्ण नांदगाव शहरातीलच आहे. त्यामुळे संपूर्ण नांदगाव शहर आजारांच्या विळख्यात जखडल्याचे चित्र दिसून येत आहे. सद्यस्थितीत लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, जुलाब, उलट्यांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील बदल आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळेच विविध आजार बळावत असल्याचे स्थानिक डॉक्टरांचे मत आहे. शहरातील शासकीय व खासगी रूग्णालये फुल्ल झाली आहेत. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार बळावले आहेत. तर आता टायफाईडने डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्य विभागाने या बाबीची दखल घेऊन उपाययजोना करण्याची गरज वर्तविली जात आहे.