राज्यातील विद्यापीठांना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 07:18 PM2020-03-27T19:18:02+5:302020-03-27T19:18:28+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या उन्हाळी २०२० परीक्षा रखडल्या आहेत. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले आहे. परीक्षांसंदर्भात नेमके काय करावे, हे अद्याप विद्यापीठांनी ठरविलेले नाहीत. आता सर्वच विद्यापीठांना परीक्षांबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.
विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये दरवर्षी उन्हाळी परीक्षांचे नियोजन एप्रिलमध्ये करण्यात येते. तथापि, लॉकडाऊन, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांचे कामकाज ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्येही शुकशुकाट आहे. परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना चिंता वाटू लागली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०२० परीक्षा १५ एप्रिलपासून घेण्याचे नियोजन चालविले होते. त्यानुसार, ३९४ महाविद्यालयांना परीक्षांचे वेळापत्रक कळविलेले होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने विद्यापीठांना उन्हाळी परीक्षांबाबत काय करावे, हे अद्याप कळू शकले नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठांकडून परीक्षांची तयारी, तारखेबाबत माहिती मागविली होती. मात्र, देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात धाकधूक वाढली आहे. सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.
राज्यात या अकृषी विद्यापीठांना परीक्षांची चिंता
मुंबई विद्यापीठ, मुंबई, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्र्वविद्यालय, रामटेक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना परीक्षांची चिंता सतावत आहे.
लॉकडाऊनमुळे परीक्षांचा कालावधी वाढेल, यात दुमत नाही. मात्र, राज्यभरात विद्यापीठांमध्ये समान स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. परंतु, उन्हाळी परीक्षाविषयी कोणता निर्णय घ्यावा, त्याकरिता यूजीसीच्या गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ