इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यासाठी उज्ज्वला क्षीरसागर यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 07:57 PM2019-07-08T19:57:13+5:302019-07-08T19:57:22+5:30
बदलत्या काळानुसार अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणात अद्ययावत सुधारणांची गरज वेळोवेळी भासते.
अमरावती - बदलत्या काळानुसार अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणात अद्ययावत सुधारणांची गरज वेळोवेळी भासते. याची जाणीव शिक्षण क्षेत्रात विचाराधीन असली तरी हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालय मात्र सातत्याने नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम व तंत्र प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना अद्ययावत करण्यावर परिश्रम घेत आहे. याबाबत अखिल भारतीय उच्च तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व इंग्लंड यांच्यात शैक्षणिक करार झाला आहे. त्यानुसार देशात टेक्निकल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी हव्याप्र अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला अनिल क्षीरसागर यांची विद्यापीठ स्तरावर एकमेव निवड झाली आहे.
अखिल भारतीय उच्च तंत्र शिक्षण परिषदेने देशातील उच्च तंत्र शिक्षणाला जागतिक व अद्ययावत स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इतर देशातील शिक्षण पद्धतीचा आपल्या शिक्षण पद्घतीशी समन्यवय साधण्याच्या अनुषंगाने इंग्लंडसोबत युक्येरी अंतर्गत शैक्षणिक करार केला आहे. यामध्ये ऊर्जा, व्यवसाय, औद्योगिक व इतर विषयांचा समावेश असून अभियांत्रिकी व उच्च तंत्र शिक्षण शिक्षणाला एक सुवर्ण संधी मिळाली आहे. या कराराला देशात कार्यान्वित करण्यासाठी युक्येरी (एआयसीटीई-इंग्लंड) देशभरात टेक्निकल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम २०१६ ते २०२१ दरम्यान राबविणार येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी देशातून १०० तज्ज्ञांची निवड केली आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पात विदर्भातून आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून केवळ हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालय इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या सर्व तज्ज्ञ सदस्यांना इंग्लंड येथील इडली कॉलेज येथून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही निवड हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आनंदाची पर्वणी ठरली असून क्षीरसागर यांचे श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मंडळाचे उपाध्यक्ष व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत चेंडके, मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, मंडळाचे उपाध्यक्ष रमेश गोडबोले, प्राचार्य अनंत बा. मराठे, रजिस्ट्रार एस.व्ही ढोले यांचेसह सर्व प्राध्यापक व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हव्याप्र अभियांत्रिकीच्या शिक्षण-प्रशिक्षणाला बळ
अखिल भारतीय उच्च तंत्रशिक्षण परिषद व इंग्लंड यांच्यातील कारारानुसार टेक्निकल लिडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबविण्यात येणार आहे. २०२० मध्ये इंग्लंड येथील इडली कॉलेज येथे या सर्व सदस्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. परिणामी हेच सर्व अद्ययावत ज्ञान व प्रशिक्षण हव्याप्र अभियांत्रिकीच्या शैक्षणिक उपक्रमांना मिळणार नव्याने बळ देणारे ठरतील.