आरओबीच्या मुद्यावर प्रशासनाला ‘अल्टिमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:16 AM2019-06-08T01:16:48+5:302019-06-08T01:17:44+5:30
आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा, असा अल्टिमेटमच खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा, असा अल्टिमेटमच खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिला.
३१ जुलैपर्यंत काम पूर्ण होईल. दस्तुरनगरकडील मार्ग जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. रेल्वेचे काम आटोपल्यानंतर बांधकाम विभागाचे काम करता येणार असल्याचे रेल्वेचे अधिकारी वाय.डी. राव यांनी सांगितले. यावर खासदरांनी बैठकीपश्चात पाहणी करून किमान नागरिक व दुचाकीसाठी अंडरपास सुरू करता येईल काय, याची पाहणी करून तोडगा काढण्यास सुचविले. बैठकीला आमदार रवि राणा, आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहआयुक्त नरेंद्र पिठे, विभागीय अधिकारी नीलेश बेलसरे, सहायक वाहतूक अधीक्षक वैशाली भाकरे, रेल्वेचे डिझाइन इंजिनीअर एन.पी. पाटील, उपअभियंता एस.एन, जसवंते, नायब तहसीलदार विजय मांजरे, वाहतुक शाखेचे राहूल आठवले, सिटी बसचे विपीन चव्हाण यांच्यासह युवा स्वाभिमाने नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. वेळेचे बंधन पाळा, विहीत मुदतीच्या आत पुर्ण करण्याच्या सूचना खासदार राणा यांनी दिल्या.
शहरातील मध्य भागात काम करीत आहात, याचे भान ठेवा. तीन वर्षांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वे विभागाद्वारे दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यामुळे किमान नागरिकांना पायी चालण्यासाठी तसेच दुचाकीसाठी आजच रस्ता मोकळा करा, अशी सूचना आमदार रवि राणा यांनी दिली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सायंकाळपर्यंत याची माहिती देतो, असे वाय.डी. राव म्हणाले. मुदतीच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी दिले. यावेळी शहर विकासासंदर्भात अनेक मुद्द्यांवर चर्चा पार पडली.
शहर बस वाहतूक शाखेची पोलखोल
शहराच्या २० किमी हद्दीत शहर बस सेवा सुरू करण्याला प्रधान सचिवांनी मंजुरी दिली. मात्र, महापालिकेत त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी सहा महिन्यांपासून झालेली नाही, याबाबत आ. रवि राणा यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ४० बस मंजूर; रस्त्यावर २५ आहेत. विद्यार्थ्यांना सुविधा नाहीत, याबाबत आ. राणा यांनी खडे बोल सुनावले.
अकोली वळणरस्त्याला गती केव्हा?
अकोली, चमननगर रस्त्याकरिता भूसंपादनासाठी १२ कोटींचा निधी खेचून आणला; मात्र प्रशासनाच्या दिरंगाईने प्रक्रियाच मंदावली. जागा उपलब्ध असल्याने ‘त्या’ २७ लोकांची बैठक लावण्याची सूचना गणेश कुत्तरमारे यांना आ. राणा यांनी केली. प्रस्तावाची फाईल या आठवड्यात जिल्ह्याधिकाºयांसमक्ष ठेवा, असे आ. राणा म्हणाले.