उमेश कोल्हे हत्याकांड : प्रतिबंधित संघटनेच्या संशयिताची 'एनआयए'कडून कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 10:50 AM2022-07-07T10:50:48+5:302022-07-07T10:56:55+5:30

शहर कोतवाली पोलिसांनी २ जुलैला शेख इरफान याला नागपुरातून अटक केल्यानंतर तोच उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आली.

Umesh Kolhe murder case : A thorough investigation by the NIA into the suspect of the banned organization | उमेश कोल्हे हत्याकांड : प्रतिबंधित संघटनेच्या संशयिताची 'एनआयए'कडून कसून चौकशी

उमेश कोल्हे हत्याकांड : प्रतिबंधित संघटनेच्या संशयिताची 'एनआयए'कडून कसून चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देघराची झाडाझडती : सातही आरोपींना अमरावतीहून मुंबईला हलविले

अमरावती : येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहिम याच्या कबुलीजबाबानुसार, त्याच्या स्वयंसेवी संस्थेला ‘फंडिंग’ करणाऱ्या एका संशयिताला ‘एनआयए’ने बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.

सूत्रांनुसार, सोहेल असे त्या संशयिताचे नाव आहे. तो एका प्रतिबंधित कट्टरवादी संघटनेच्या जिल्हा शाखेचा अध्यक्ष आहे. एनआयएचे पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम खलाटे व पोलीस अधीक्षक प्रवीण इंगवले यांच्या नेतृत्वातील चमूने सोहेल याला त्याच्या छायानगर स्थित राहत्या घरातून ताब्यात घेतले.

एनआयएने बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २.४० पर्यंत नागपुरी गेट पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी केली. दुपारी २.४०च्या सुमारास एनआयएच्या अधिकाऱ्यांनी नागपुरी गेट पोलीस ठाणे सोडले. एनआयएने या तपासात प्रचंड गोपनीयता बाळगली आहे. यामुळेच सोहेलला ताब्यात घेतले असले तरी त्याला अटक करण्यात आली की कसे, याबाबत दुजोरा मिळू शकला नाही. शहर कोतवाली पोलिसांनी २ जुलैला सायंकाळी शेख इरफान (३५. रा. कमेला ग्राऊंड, अमरावती) याला नागपुरातून अटक केल्यानंतर तोच उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आली.

४ जुलैला त्याला एनआयएने ताब्यात घेतले. यावेळी तपासादरम्यान आपली रहबर हेल्पलाइन नामक एनजीओ असून, त्याद्वारे कोरोना काळात अनेकांना मदत केल्याची कबुली शेख इरफानने दिली. त्यामुळे शेख इरफानसारख्या सामान्य तरुणाकडे इतकी रक्कम कुठून आली, याचा शोध एनआयएने चालविला. त्याचा ‘रहबर’ कोण, याचा सूक्ष्म तपास केला असता, राज्याबाहेरील एक कट्टरवादी प्रतिबंधित संघटना व त्या संघटनेच्या स्थानिक म्होरक्याचे नाव समोर आले. सोहेल नामक त्या म्होरक्याने आपल्या रहबर हेल्पलाईनला फंडिंग केल्याची कबुली शेख इरफानने दिली. त्या माहितीवरून एनआयएने नागपुरी गेट पोलिसांच्या सहकार्याने सोहेल याला बुधवारी सकाळी ताब्यात घेऊन नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी करण्यात आली.

कोरोना चाचणी करून रवानगी

उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने २ जुलैला एनआयएकडे सोपविला. त्यामुळे ४ जुलैला सातही आरोपींचा ताबा आपल्याला मिळावा, असा अर्ज एनआयएने स्थानिक न्यायालयात दाखल केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने सातही आरोपींना चार दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. ८ जुलैला सातही आरोपींना मुंबईच्या एनआयए न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी सातही आरोपींची स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अमरावती पोलिसांनी पुरविलेल्या वाहनातून मुंबईकडे हलविण्यात आले.

आठवा आरोपी पसारच

सातही आरोपींच्या कबुलीनंतर आठव्या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. शमीम नामक त्या संशयित आरोपीच्या अलकरीमनगर स्थित घराची बुधवारी सकाळी एनआयएने झाडाझडती घेतली. मात्र, तो स्थानिक पोलीस वा एनआयएच्या हाती लागला नाही. ८ जुलैला एनआयएला मुंबई न्यायालयात हजर राहायचे असल्याने शमीमचा युद्धस्तरावर शोध घेतला जात आहे.

Web Title: Umesh Kolhe murder case : A thorough investigation by the NIA into the suspect of the banned organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.