उमेश कोल्हे हत्याप्रकरण; ‘एनआयए’ने फरार आरोपीवर ठेवले दोन लाखांचे बक्षीस
By प्रदीप भाकरे | Published: September 13, 2022 06:13 PM2022-09-13T18:13:47+5:302022-09-13T18:17:19+5:30
अटक आरोपींची संख्या दहावर
अमरावती : येथील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील फरार आरोपी शहीम अहमद फिरोज अहमद याच्यावर एनआयएने दोन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. त्याची माहिती वा त्याला अटक करून देणाऱ्यास ती रक्कम देण्यात येईल.
येथील श्याम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी शमीम अहमद ऊर्फ फिरोज अहमद (२२, जाकीर कॉलनी, अमरावती) याची माहिती देणाऱ्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्माच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २ जुलै रोजी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. एनआयएच्या एंट्रीपूर्वी शहर पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना, तर एनआयएने तीन आरोपींना अटक केली होती. विशेष म्हणजे शेख इरफान या मुख्य सूत्रधाराच्या बयाणातून शहीम अहमदचे नाव समोर आले होते. सबब, शहर पोलिसांसह एनआयएनेदेखील शहीम अहमदच्या घराची अनेकदा झाडाझडती घेतली होती. मात्र, त्याच्यासोबतच त्याचे कुटुंबीय देखील शहरातून पसार झाले असून, तो २१ जूनच्या घटनेपासून फरार आहे. त्यामुळे त्याच्याबाबतची माहिती देणाऱ्यास एनआयएने दोन लाख रुपये नगदी बक्षीस घोषित केले आहे. एनआयएने शहर कोतवाली व नागपुरी गेट पोलिसांच्या साहाय्याने शहीम अहमदच्या जाकीर काॅलनी भागात अनेकदा सर्चिंग केले. मात्र, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
दहाजणांना अटक
एनआयएने २ जुलै रोजी गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार आरोपींविरुद्ध भादंविचे कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचणे), ३०२ (हत्या), १५३ अ, १५३ ब (धर्म, जात, स्थळाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) व यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास एनआयए करीत असून आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहीम अहमद मात्र अद्यापही फरार आहे.