उमेश कोल्हे हत्याकांड : ‘एनआयए’चे तपास पथक आरोपींना घेऊन पुन्हा अमरावतीत
By प्रदीप भाकरे | Published: July 14, 2022 12:08 PM2022-07-14T12:08:25+5:302022-07-14T12:11:16+5:30
२१ जून रोजी रात्री अमरावतीत उमेश कोल्हे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. २ जुलै रोजी तो खून भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचा खुलासा शहर पोलिसांनी केला होता.
अमरावती : येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणातील सातही आरोपींची १५ जुलैपर्यंत कोठडी घेतल्यानंतर पैकी दोन आरोपींना घेऊन एनआयएने बुधवारी सकाळी पुन्हा एकदा अमरावती गाठले. शहर कोतवाली पोलिसांच्या सहकार्याने एनआयएने नागपुरी गेट व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काही संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली. घटनास्थळाचेदेखील सूक्ष्म निरीक्षण केले. या संपूर्ण प्रकरणात आठवा आरोपीचा सहभाग स्पष्ट झाला असून एनआयएने त्याचा शोध चालविला आहे. दरम्यान,एनआयएने बुधवारी तो क्राईम सिन ‘रिक्रियेट’ करून संपूर्ण घटनाक्रम नव्याने जाणून घेतला.
२१ जून रोजी रात्री येथील प्रभात चौकाकडून श्याम चौकाकडे निघणाऱ्या गल्लीत उमेश कोल्हे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. २ जुलै रोजी तो खून भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचा खुलासा शहर पोलिसांनी केला होता. त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयाने तो तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले होते. पुढे ४ जुलै रोजी अमरावती न्यायालयात अर्ज दाखल करून एनआयएने सातही आरोपींचा ताबा मागितला होता. त्यानुसार सर्वांना चार दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला.
६ जुलै रोजी आरोपींना वैद्यकीय व कोरोना चाचणीनंतर मुंबईला हलविण्यात आले. तर, ७ जुलै रोजी मुंबईच्या विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध यूएपीएअन्वये स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आला असून, आरोपींना फंडिंग करणारी संघटना व आक्षेपार्ह साहित्य नेमके कोणत्या संघटनेचे हे शोधण्यासाठी कोठडीची मागणी करण्यात आली. एनआयएचा युक्तिवाद ग्राह्य धरत सातही आरोपींना १५ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
‘इंटरनॅशनल लिंकेजेस’तपासणार...
सातपैकी उमेश कोल्हे यांनी फॉरवर्ड केलेल्या पोस्टचे स्क्रिनशॉट अन्य ग्रुपवर पाठविणारा डॉ. युसूफखान व प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान यांना घेऊन एनआयएचे वरिष्ठ तपास अधिकारी बुधवारी दुपारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. शेख इरफानचे ‘इंटरनॅशनल लिंकेजेस’ तपासण्यासाठी काही ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली. तर, ज्या भुऱ्या नामक आरोपीने उमेश कोल्हे यांचा गळा कापला, ती पद्धत दहशतवादी संघटनेप्रमाणे असल्याने भुऱ्या वा इतरांना तसे प्रशिक्षण देण्यात आले की कसे, याबाबतही एनआयएने तपास चालविल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण
२ जुलै रोजी उमेश कोल्हे यांच्या खून भाजपच्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचा खुलासा शहर पोलिसांनी केला होता. त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयाने तो तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले होते.