उमेश कोल्हे हत्या प्रकरण : सहायक पोलीस निरीक्षकांसह सहा अंमलदार तडकाफडकी ‘अटॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 04:02 PM2022-07-13T16:02:13+5:302022-07-13T16:07:02+5:30

पोलीस आयुक्तालयाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. या दंडुक्यामुळे अवघ्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Umesh Kolhe murder case: Six police officers, including assistant police inspector, 'attached' to headquarters | उमेश कोल्हे हत्या प्रकरण : सहायक पोलीस निरीक्षकांसह सहा अंमलदार तडकाफडकी ‘अटॅच’

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : सहायक पोलीस निरीक्षकांसह सहा अंमलदार तडकाफडकी ‘अटॅच’

Next
ठळक मुद्देसीपींचा दंडुका : कारवाईचा बडगा

अमरावती : नागपुरी गेट ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, तेथीलच बिट सांभाळणारे चार पोलीस अंमलदार, शहर कोतवालीतील डीबी प्रमुखासह विशेष शाखेतील एकासह सात अधिकारी कर्मचाऱ्यांना सोमवारी सायंकाळी तडकाफडकी मुख्यालयी संलग्न करण्यात आले. पोलीस आयुक्तालयाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. या दंडुक्यामुळे अवघ्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर पहिले दोन आरोपी पकडण्यात शहर कोतवालीला आलेले अपयश, गुन्ह्याचे कारण स्पष्ट करण्यास घेतलेला १२ दिवसांचा कालावधी, तेथील डीबी प्रमुखाने त्याकडे केलेले कथित दुर्लक्ष, खा. डॉ. अनिल बोंडे यांनी केलेले आरोप व नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्ट, त्याअनुषंगाने काहींना आलेल्या धमक्या, नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपी व संशयितांकडे मिळालेले आक्षेपार्ह साहित्य, या सर्व बाबींच्या अनुषंगाने ‘मुख्यालयी अटॅच’ ची कारवाई करण्यात आली. एसीपीद्वारे संबंधित ठाणेदार व पोलीस निरीक्षकांसह त्या सातही जणांना त्वरेने सोडण्याचे आदेश सोमवारी सायंकाळनंतर जारी करण्यात आले. तत्पूर्वी, नागपुरी गेट व शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका खुफियासह विशेष शाखेतील दोघांना मुख्यालयी संलग्न करण्यात आले होते. आता, विशेष शाखेतील एक धार्मिक हेड सांभाळणाऱ्या पोलीस अंमलदारालादेखील मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले.

शहर कोतवालीत खांदेपालट?

२१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. शहर कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर २३ जून रोजी शहर कोतवालीऐवजी गुन्हे शाखेने मुदस्सीर अहमद व शाहरुख पठाण यांना अटक केली. तर, दोन आरोपीदेखील निष्पन्न केले. यात सायबर पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. यात कोतवाली व डीबीचे अपयश प्रामुख्याने उजेडात आले. त्याअनुषंगाने तेथील डीबीप्रमुख व खुफियाला तडकाफडकी हटविण्यात आले. त्यामुळे आगामी काळात तेथे नेतृत्वबदल होईल, अशी शक्यता पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मोटो नव्हे, तर आरोपी अटकेला प्राधान्य

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानुसार, स्थानिक स्तरावर घडणाऱ्या खुनाच्या घटनांचे कारण जुने वैमनस्य, प्रेमप्रकरण, संपत्तीचा वाद, वर्चस्व गाजविणे, भाईगिरी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या खुनाचा तपास करताना स्थानिक पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास प्राधान्य दिले. पाचही आरोपींनी खुनाची कबुली दिली. मात्र, सहाव्याकडे बोट दाखविले. त्यामुळे सहावा आरोपी हाती आल्यानंतर हत्येचा ‘मोटो’ उघड झाला. स्थानिक पोलीस यंत्रणा आरोपींना अटक करण्यासच प्रथम प्राधान्य देत असल्याची पुष्टी त्या अधिकाऱ्याने ‘शोकॉज’च्या पार्श्वभूमीवर जोडली.

Web Title: Umesh Kolhe murder case: Six police officers, including assistant police inspector, 'attached' to headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.