अन, चैतन्याचा प्रवाह थांबला

By admin | Published: April 10, 2015 12:27 AM2015-04-10T00:27:45+5:302015-04-10T00:27:45+5:30

१० एप्रिल १९६५ रोजी रात्री १२.३० चे सुमारास डॉ. पंजाबरावांची प्राणज्योत निमाली.

Un, the ceaseless flow stopped | अन, चैतन्याचा प्रवाह थांबला

अन, चैतन्याचा प्रवाह थांबला

Next

राजेंद्र गायगोले दर्यापूर
१० एप्रिल १९६५ रोजी रात्री १२.३० चे सुमारास डॉ. पंजाबरावांची प्राणज्योत निमाली. अगोदरच्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल १९६५ रोजी त्यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तडाखेबंद भाषण केले. घरी येताच विमलाबाईंना बेसन भाकरी करण्याचे आदेश देऊन भाऊसाहेबांची मोटार बंगल्यातून बाहेर पडली. ती थेट लोकनायक बापूजी अणे यांच्या घरी जाऊन थांबली. तिथे त्यांच्या लोकसभेतील भाषणावर व त्यामधून मांडलेल्या प्रश्नासंदर्भात बापू अणेंसमवेत चर्चा करुन ते सायंकाळी ६ वाजता घरी परतले. त्यांच्या १२ जनपथ या बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर ते खूर्चीवर बसले असताना त्यांना अस्वस्थता जाणवली. त्यांनी हिरवळीवर अंग टाकले.
'भारतरत्ना'ने गौरविणे हाच खरा सन्मान
दिवसभराची दगदग कामाची गर्दी त्यात आपण जेवलो नाही. यामुळे कदाचित अस्वस्थ वाटत असेल म्हणून त्यांनी विमलाबाईना जेवण वाढण्याची तयारी करण्यास सांगितले. कामकरी नामदेव याला शेजारच्या हॉटेलातून बेसन लाडू आणावयास धाडले. त्यानंतर त्यांनी जेवण घेतले. मात्र जेवण घेतल्यावरसुद्धा त्यांच्या जीवाची तगमग काही कमी झाली नाही. परिणामी डॉक्टरांना बोलवण्यात आले. डॉक्टर आले तेव्हा भाऊसाहेब हिरवळीवर लोळत होते. त्यांना इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर भाऊसाहेबांना थोडे बरे वाटले. डॉक्टरांनी त्यांना आहे त्या अवस्थेत पडून राहायला सांगितले. भाऊसाहेबांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. शरीराची हालचाल होताच त्यांच्या छातीत कळ आली. भाऊसाहेब बेशुध्द झाले. त्यांना दिल्लीच्या विलिंग्डन इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराची शर्त केली. मात्र नियतीने आपला डाव साधला. बहुजनांच्या उत्कर्षासाठी धावणारा भाऊसाहेबांचा चैतन्यमयी देह शांत झाला. दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांच्यावर अगदी साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. लोकसभेचे सभापती हुकूमसिंह, पंतप्रधान लालहबहादूर शास्त्री, संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनायक बापुजी अणे, जर्मनीचे राजदूत हर्बर्ट बंकर, गुलजारीलाल नंदा, इंदिरा गांधी, विविध प्रांताचे मुख्यमंत्री आदी मान्यवर भाऊसाहेबांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
दीर्घकाळ कृषिमंत्री या नात्याने देशसेवा करणारा लोकसेवक, सार्वजनिक जीवनातील एक प्रेरक व्यक्तित्त्व, निष्ठावंत समाजसुधारक, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थाचे संघटनांचे जनक, तंजावर-बडोदा, इंदौर, ग्वाल्हेर, चंदीगढपर्यंत ज्यांचे नेतृत्व सर्वमान्य होते व मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा सुवर्णमयी ठसा उमटविला होता. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे खरे वारसदार घटना समितीतील बाबासाहेबांचे सच्चे सहकारी शिक्षण, कृषी व कृषक समाज सुधारणा, धार्मिक सुधारणा, विज्ञान, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्यलढा असो की, आझाद हिंद सेनेच्या शिलेदारांचा ऐतिहासिक खटला चालविणे अशा विविधांगी पैलूंनी सजलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राला भारतरत्नाने गौरविल्यास त्यांच्या ५० व्या स्मृतिदिनवर्षात आगळी वेगळी आदरांजली ठरू शकेल.

Web Title: Un, the ceaseless flow stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.