मंगल कार्यालयात घेतली विनापरवानगी प्रचारसभा, आचारसंहिता उल्लंघनामुळे दाखल झाला गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: April 4, 2024 04:11 PM2024-04-04T16:11:59+5:302024-04-04T16:12:26+5:30
२ एप्रिल रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान ती विनापरवानगी प्रचारसभा घेण्यात आली
अमरावती: शंकरनगरस्थित हर्ष मंगलम या मंगल कार्यालयात विनापरवानगी प्रचारसभा घेण्यात आली. याप्रकरणी, बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या भरारी पथकप्रमुख अमोल सराड (४२) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी ३ एप्रिल रोजी सायंकाळी हर्षवर्धन बोबडे व युवा स्वाभिमानच्या १५० कार्यकत्याविरूध्द आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला. २ एप्रिल रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान ती विनापरवानगी प्रचारसभा घेण्यात आली.
फिर्यादी सराड हे भरारी पथकप्रमुख असून ते शहरात पेट्रोलिंग करीत असतांना युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची हर्ष मंगलम येथे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विनापरवाना प्रचार सभा सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे ते पथकासह तेथे पोहोचले असता तेथे हर्षवर्धन बोबडे व अंदाजे १५० युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकत्यांनी विनापरवाना प्रचार सभा आयोजित केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विनापरवानगी प्रचारसभा घेऊन आरोपींनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, अशी तक्रार सराड यांनी नोंदविली.