अनधिकृत खत प्रकरण : रात्री चार पथके गठित, सकाळी जबलपूरला रवाना
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 20, 2023 05:18 PM2023-08-20T17:18:41+5:302023-08-20T17:18:53+5:30
या प्रकरणात चार पथकांचे गठन करण्यात आलेले आहे. त्यापैकी एक पथक रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे रवाना झाले आहे
अमरावती : माहुली जहागीर गोदामातील अनधिकृत २.३९ कोटींच्या खत प्रकरणाची व्याप्ती पाहता पाळेमुळे खंदून काढण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शनिवारी रात्री चार पथके गठित केली. यामध्ये एसडीपीओ सूर्यकांत जगदाळे यांचे नेतृत्वात पाच अधिकारी तसेच २० पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या प्रकरणात चार पथकांचे गठन करण्यात आलेले आहे. त्यापैकी एक पथक रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे रवाना झाले आहे. जप्त रासायनिक खतांच्या बॅगवर जबलपूर येथील दोन कंपन्यांची नावे अंकित आहेत. या कंपन्यांची नोंदणी संशयास्पद वाटत असल्याने यावर प्रथम फोकस करण्यात आल्याची पोलिस विभागाने दिली. तपासात आणखी काही बाबींचा उलगडा होत पुढील कडी उलगडणार आहे.
कृषी व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी रात्री उशिरा माहुली जहागीर येथील अनधिकृत गोदामात छापा मारून २.३९ कोटींचे रासायनिक खत जप्त करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात विक्री बंद असलेला खतांचा २५ व ४० किलोच्या पॅकिंगमध्ये ११,७८९ बॅगमध्ये हा साठा होता. पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास एसडीपीओ सूर्यकांत जगदाळे करीत आहेत.