अचलपूर-परतवाड्यातील अनधिकृत पोस्टर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:51 AM2018-01-06T01:51:41+5:302018-01-06T01:51:53+5:30
अचलपूर नगरपालिकेने १ जानेवारीपासून अनधिकृत पोस्टर, बॅनर, फ्लेक्स व पताके काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. अचलपूर, परतवाडा शहरातील झाडांसह इलेक्ट्रिक पोलवरील शेकडो बॅनर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर नगरपालिकेने १ जानेवारीपासून अनधिकृत पोस्टर, बॅनर, फ्लेक्स व पताके काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. अचलपूर, परतवाडा शहरातील झाडांसह इलेक्ट्रिक पोलवरील शेकडो बॅनर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढले.
अचलपूर नगरपालिका हद्दीत जागा मिळेल तेथे पोस्टर, बॅनर, पताका, झेंडे लावण्यात आलेले होते. त्यामुळे जुळे शहर विद्रुप दिसत होते. विशेष म्हणजे, त्यासाठी परवानगीही घेण्यात आलेली नव्हती. या प्रकाराला आळा बसावा, पालिकेला कर प्राप्त व्हावा व योग्य परवानगीने नियोजित ठिकाणीच ते लावले जावेत, याकरिता नगरपालिकेने बॅनर हटाव मोहिमेला सुरुवात केली होती.
कचरापेटीची सक्ती, कॅरीबॅग बंदी
जुळ्या शहरांतील दुकानांमध्ये विक्रेत्यांनी प्लास्टिक कॅरीबॅग ठेवू नये, यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तरीदेखील विक्रेते मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर करीत आहेत. अशा दुकानदारांवर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दुकानांवर छापे टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. याचबरोबर प्रत्येक दुकानापुढे कचरापेटी लावावी, अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील पत्र दुकानमालकांना देण्यात आले आहेत. शहरातील शिवाजी संकुलामध्ये दुकानदारांनी नगरपालिकेच्या या भूमिकेचे स्वागत केले. शहर सुंदर आणि स्वच्छ राहावे, यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप स्वत: या मोहिमेवर लक्ष देत आहेत.