नांदगावात अनधिकृत पुतळा, डझनभर लोकांविरूद्ध गुन्हे
By प्रदीप भाकरे | Published: November 9, 2023 12:52 PM2023-11-09T12:52:55+5:302023-11-09T12:53:25+5:30
पुतळा निष्कासन : नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी नोंदविली तक्रार
अमरावती : नांदगाव खंडेश्वर येथे अनधिकृतपणे पुतळा उभारल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तेथीलच डाॅ. भुषण संजय पोतदार (४०), अविनाश सदाशिव ब्राम्हणवाडे (३५, दोन्ही रा. नांदगाव खंडेश्वर) व अज्ञात दहा ते १२ इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याधिकारी नंदू परळकर यांनी याबाबत ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास तक्रार नोंदविली.
अमरावती यवतमाळ रोडवरील नांदगाव खंडेश्वर बसस्टॅंड जवळ नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या जलकुंभावर विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. ती बाब २४ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास उघड झाली. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करत त्या पुतळ्याचे निष्कासन केले. तथा तो पुतळा नेमका कुणी उभारला, त्याबाबत चौकशी आरंभली. चौकशीअंती तो पुतळा डॉ. पोतदार व ब्राम्हमवाडे यांच्या पुढाकाराने लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार नोंदविली.
या कलमान्वये गुन्हा दाखल
भादंविचे कलम १४३, १४७, महाराष्ट्र पुतळ्याचे पावित्र्य भंगास प्रतिबंध अधिनियम १९९७ च्या कलम ११, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.