युरियाचा असंतुलित वापर पिकांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:40+5:302021-07-18T04:09:40+5:30
अमरावती : सद्यस्थितीत युरिया हे सर्वांत स्वस्त नत्रयुक्त खत असल्याने शेतकऱ्यांचा पिकांना युरिया देण्याकडे जास्त कल दिसून येतो. ...
अमरावती : सद्यस्थितीत युरिया हे सर्वांत स्वस्त नत्रयुक्त खत असल्याने शेतकऱ्यांचा पिकांना युरिया देण्याकडे जास्त कल दिसून येतो. परंतु, युरिया खताचा वारेमाप वापर हा अनेक पिकांना फायद्यापेक्षा नुकसानकारकच असल्याचे कृषितज्ज्ञांचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे कीड, रोगांच्या प्रादुर्भावात वाढत असल्याने खतांचा योग्य व संतुलित वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सोयाबीन, मूग, उडीद, तूर, बरबटी यांसारखे शेंगावर्गीय द्विदल पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असलेल्या जिवाणूंच्या सहाय्याने हवेतील नत्र शोषून घेऊन नत्राची गरज भागवतात. त्यामुळे या पिकांना रासायनिक खताची शिफारशीत मात्रा ही पेरणी करतानाच देणे आवश्यक असते तसेच या पिकांची नत्राची गरजसुद्धा कमी असते. या पिकांना उगवणीनंतर वाढीच्या अवस्थेत युरिया किंवा इतर नत्रयुक्त खत दिल्यास पिकांची अनावश्यक कायिक वाढ होते. म्हणजे झाडांची उंची वाढते. त्यामुळे दोन कांड्यांमधील अंतर वाढते व झाडावरील कांड्यांची संख्या मात्रा कमी होते. परिणामी झाडांवरील पानांची संख्या व पानांच्या कोनातून येणाऱ्या फुलांची व शेंगाची संख्यासुद्धा कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येते.
नत्रयुक्त खत दिल्याने पिकांच्या फुलावर येणाऱ्या कालावधी वाढतो तसेच झाडांची कायिक वाढ होऊन पिकांचा लुसलुशीतपणा वाढल्यामुळे पिकावर रस शोषण करणाऱ्या व शेंडा अथवा खोड पोखरणाऱ्या व इतरही किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता बळावते. यापुढे कीड नियंत्रणावरील खर्चातसुद्धा अनावश्यकरीत्या भर पडते. या सर्व परिस्थितीचा विचार करून सोयाबीन, मूग, उडीद, तुर, बरबटी या पिकांमध्ये युरीयाचा दुसरा डोस देणे टाळावे, असे आवाहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
बॉक्स
असा करावा वापर
* शेंगावर्गीय पिकांबरोबर कपाशी, ज्वारी, मका या पिकांमध्येसुद्धा युरियाचा अतिवापर किड रोगांना निमंत्रण देणारा असल्याने याही पिकांमध्ये युरियाचा वापर मर्यादित करावा.
* पिके पोटरीवर वा फुलावर आल्यानंतर जमीनीतून युरिया देणे पूर्णत: टाळावे. सोयाबीनमध्ये पेरणीनंतर ५० व ७० दिवसांनी दोन टक्के (१०० लिटर पाण्यात २ किलो युरीया) युरियाची फवारणी करावी.
बॉक्स
या खतांचीदेखील शिफारस
सोयाबीनचे पीक शेंगा धरण्याचा अवस्थेत २ टक्के १९:१९:१९ नत्र स्फुरद व पालाश किंवा डीएपी या खताची फवारणी करण्याची शिफारस आहे. त्याचप्रमाणे कापूस पीक फुलावर असताना २ टक्के युरियाची आणि बोंडे भरण्याचा अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी केल्यास कापूस उत्पादनात वाढ झाल्याचे निष्कर्ष आहेत.
कोट
सोयाबीन, मूग, उडीद यासारख्या पिकांना युरियाचा दुसरा डोस देणे कटाक्षाने टाळावे व कापूस, ज्वारी, मका पिकांनासुद्धा युरियाचा वापर मर्यादित व शिफारशीप्रमाणे करावा.
- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी