बेशरमचे रोपटे लावून नोंदविला प्रतिकात्मक निषेध
By admin | Published: June 10, 2016 12:12 AM2016-06-10T00:12:34+5:302016-06-10T00:12:34+5:30
विना अनुदानित शाळा व कर्मचाऱ्यांनी त्यांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मागील ९ दिवसांपासून बेमुदत उपोषण चालविले आहे.
बेमुदत उपोषणाचा नववा दिवस : शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शासन उदासिन, आतापर्यंत १८ शिक्षक रूग्णालयात दाखल
अमरावती : विना अनुदानित शाळा व कर्मचाऱ्यांनी त्यांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मागील ९ दिवसांपासून बेमुदत उपोषण चालविले आहे. मात्र, या आंदोलनाची शासनस्तरावर गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात गुरूवारी शिक्षकांनी बेशरमचे रोपटे लावून शासनाचा प्रतिकात्मक निषेध नोंदविला.
वृक्षारोपणाप्रसंगी आ. श्रीकांत देशपांडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, माजी आमदार वसंतराव खोटरे, विना अनुदानित शाळा कृती समितीचे पुंडलिकराव रहाटे, सुधाकर वाहुरवाघ, संगीता शिंदे, सुरेश शिरसाट, बाळकृष्ण गावंडे, दीपक धोटे, रमेश चांदुरकर, सुभाष गवई, गोपाल चव्हाण, विजय देशमुख, दीपक देशमुख, गाजी जाहेरोश, सुनील देशमुख, रामेश्वर बोंद्रे, प्रशांत डवरे, गोपाल राठोड, विस्मय ठाकरे, नीलेश पारडे, बबन तायडे आदी उपस्थित होते. विना अनुदानित शाळा कृती समितीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रक्तदान शिबिर, मूकमोर्चा, थाळीनाद आदी प्रतिकात्मक आंदोलने केली आहेत. एकीकडे बेमुदत उपोषण व दुसरीकडे प्रतिकात्मक आंदोलनांचा धडाका शिक्षकांनी सुरूच ठेवला आहे. गुरूवारी शिक्षकांनी चक्क बेशरमचे रोपटे लावून शासनाचा अभिनव पद्धतीने निषेध नोंदवून त्यांच्या संतप्त भावना प्रकट केल्या आहेत. गुरूवारी बेमुदत उपोषणास बसलेले शिक्षक रामेश्वर बोंद्रे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत १८ शिक्षकांना रूग्णालयात दाखल केल्याची नोंद आहे.
शासननिर्णय येईपर्यंत उपोषण सुरुच : भोयर
विना अनुदानित शाळांचे शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अनुदानासाठी बेमुदत उपोषण सुरुच ठेवले आहे. प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, अशी मागणी असून ही मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी मार्गदर्शन करताना दिला. आता शासनाकङून आश्वासन नव्हे तर मागण्यांच्या पूर्ततेचे आदेश हवेत. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेखर भोयर यांनी घेतली आहे.
शिक्षण उपसंचालकांना दिले निवेदन
मागील ९ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विना अनुदानित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रचलित नियमानुसार अनुदान मंजूर करण्यात यावे, ही त्यांची मागणी आहे. गुरुवारी येथील शिक्षण उपसंचालकांना समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विना अनुदानित शाळा कृती समितीचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.