बेशिस्त वाहतूक ठरली तरूणीचा काळ

By admin | Published: December 3, 2015 12:17 AM2015-12-03T00:17:50+5:302015-12-03T00:17:50+5:30

येथील आदर्श हायस्कूलजवळ मंगळवारी निष्पाप तरुणीचा वाहन अपघातात घटनास्थळीच बळी गेला.

Uncertain transport | बेशिस्त वाहतूक ठरली तरूणीचा काळ

बेशिस्त वाहतूक ठरली तरूणीचा काळ

Next

दर्यापूर पोलिसांचे दुर्लक्ष : चौकात अवैध वाहतूक फोफावली, कृष्णालीचा हृदयद्रावक मृत्यू
संदीप मानकर दर्यापूर
येथील आदर्श हायस्कूलजवळ मंगळवारी निष्पाप तरुणीचा वाहन अपघातात घटनास्थळीच बळी गेला. तरूणीच्या अकाली मृत्यूसाठी बेशिस्त वाहतूकच जबाबदार असल्याची भावना दर्यापूरकर नागरिकांनी व्यक्त केली आहे. कृष्णाली विनायकराव घाटे (२२ रा. सहकारनगर) या तरुणीचा एकता हॉस्पीटलसमोर दुर्देवी मृत्यू झाला. परंतु एकता हॉस्पीटल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची घटना कैद झाली आहे.
उजवीकडून नियमबाह्य पध्दतीने छोटी आॅटोरिक्षा आल्याने समोरुन येणाऱ्या कटलाधारकाची अडचण झाली. दरम्यान दुचाकीधारक तरूणीने कटल्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता एका डॉक्टरचेही वाहन आले. दोघांनाही मागून येणारा ४०७ ट्रक न दिसल्याने दुचाकीस्वार मुलगी उजव्या बाजूला पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकात येवून चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात डॉक्टर व मृत युवतीची बहिण जखमी झाली. या अपघातानंतर अख्खे दर्यापूर शहर खडबडून जागे झाले आहे. दर्यापूर शहरात भरधाव वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथील मुख्य चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे सामान्यांना पायी चालताना सुध्दा तारेवरची कसरत करावी लागते. परंतु नो-पार्किंग झोनमध्ये वाहने लावणाऱ्या वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात येत नाही. येथील बसस्थानक चौकात तीन हॉटेल्स असून या हॉटेल्सच्या समोर मुख्य रस्त्यावर नागरिक रस्त्याच्या कडेपर्यंत वाहने उभी करतात. येथील मुख्य चौकात फळविक्रेत्यांनी भर रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
सहा महिन्यांपूर्वी एका चारचाकी वाहनाचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ही गाडी दुकानात शिरली होती. एसटीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बससुध्दा हॉटेलमध्ये शिरल्याची घटना ताजीच आहे. येथील रेल्वे फाटकाजवळ अतिक्रमित जागेत अनेकांनी दुकाने थाटली आहेत. आॅटोरिक्षाच्या दुरूस्तीचे काम करणाऱ्या एका मॅकेनिकने तर रस्त्याच्या मधोमध आॅटोरिक्षा उभी करण्याचा सपाटा लावला आहे. कारवाई होेत नसल्याने त्याची हिंमत बरीच वाढली आहे. रेल्वे फाटक, सांगळूदकर कॉम्प्लेक्स तसेच आकोट नाका रस्त्यावर कुठेही काळी-पिवळी मॅजिकव्हॅन व ईतर वाहने बेशिस्तरित्या उभी असतात व नियमांचे उल्लंघन करतात. परंतु पोलीस त्यांच्यावर थातुरमातूर कारवाई करुन सोडून देतात. दोन वर्षांपूर्वी बसस्थानक चौकात शिरलेल्या आॅटोरिक्षा व अन्य वाहने पोलिसांनी बाहेर काढून त्यांना अमरावती, मूर्तीजापूर रस्त्यावर अधिकृत जागा दिली होती.
त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात घट झाली होती. परंतु आता पुन्हा त्यांनी बसस्थानक चौकासमोर त्यांचा ठिय्या केला आहे. अवैध रेतीतस्करही शहरातून बेशिस्त वाहतूक करतात. यानंतरे मोठे अपघात टाळायचे असतील तर बेशिस्त वाहतुकीला लगाम लावणे पोलिसांचे कर्तव्य महत्वाचे राहाणार आहे. अशा वाहनचालकाविरुध्द कारवाई करणे गरजेचे आहे.

Web Title: Uncertain transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.