शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:18+5:302021-05-06T04:13:18+5:30
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ मे रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु ...
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ मे रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात कोणत्याही ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय दिले आहे. राज्य शासनाकडून विदर्भात २८ जूनपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अनिश्चितता आहे. दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिलला होणार होती. परंतु कोरोनाच्या संकटामुळे ती २३ मे पर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, आता २८ जूनपर्यंत परीक्षा घेणे शक्य होणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यासह मोठ्या प्रमाणात पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार नाही. परीक्षा लांबणीवर पडली तरी चालेल. पण परीक्षा घ्यावी, असा आग्रह शिक्षक-पालक काढून केला जात आहे. शिक्षण विभागाचीदेखील परीक्षेची सर्व तयारी झाली असून, केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.