जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनांची बेशिस्त पार्किंग
By Admin | Published: May 15, 2017 12:09 AM2017-05-15T00:09:46+5:302017-05-15T00:09:46+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहे. ज्या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो.
नियमबाह्य : नो- पार्किंगमध्येही लावली जातात वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहे. ज्या ठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो. त्याच ठिकाणी नियम पाळले जात नसतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा, हा प्रश्न पुढे येत आहे. ज्या ठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावले आहे त्याच ठिकाणी नागरिक व कार्यालयातील कर्मचारी राजरोसपणे वाहन पार्किंग करीत आहे.
एवढ्यावरच ते थांबले नसून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रवेशव्दारापर्यंत वाहने लावण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एक शिस्त असायला हवी. येथे प्रवेशव्दाराजवळून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला नो- पार्किंगचे दोन फलक लावण्यात आले आहे. पण याच ठिकाणी फलकावरची सूचनेचे पालन होत नाही. त्यामुळे खुद जिल्हाधिकाऱ्यांनी या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे. अशी मागणी होत आहे.
खनिकर्म विभागापर्यंत पार्किंग
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी परिसरात तर बेशिस्त वाहने लावले जात आहेत. पण ते एवढ्यावरच थांबले नसून रोेजगार हमी योजना विभाग व खनिकर्म विभागाच्या प्रवेशव्दाराच्या परिसरात बेवारसपणे वाहने पार्किंग करून जणू काही शिस्तभंगच करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी येथे बेशिस्त वाहने लावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवार्इंचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा आहे.
बेशिस्तपणे आॅटोचीही एंट्री
जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेरील आॅटोसुद्धा पार्किंग करीत आहे. हा प्रकार नियमबाह्य असून परिसरात आॅटोचालक वाहने आणतात कशी हा प्रश्नही चर्चेला जात आहे. या ठिकाणी काही शासकीय वाहनेसुद्धा नियमात पार्किंग करीत नाहीत. त्यामुळे येथे शिस्त केव्हा लावण्यात येणार, हा प्रश्न विचारला जात आहे.
नो पार्किंगच्या ठिकाणी बेशिस्तपणे वाहने लावली जात असतील तर संबंधितांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल. त्यासंदर्भाची आपण माहिती घेणार असून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देऊ.
- अभिजित बांगर,
जिल्हाधिकारी, अमरावती