बेशिस्त अतिक्रमणधारकांच्या आयुक्तांना वाकुल्या !

By admin | Published: April 6, 2016 12:07 AM2016-04-06T00:07:36+5:302016-04-06T00:07:36+5:30

दिवसेंदिवस वाढत चाललेला बकालपणा, गिळंकृत करण्यात आलेले पदपथ आणि बेशिस्त अतिक्रमणाने शहराचा ‘चेहरा’ काळवंडत चालला आहे.

Unconscious encroachments | बेशिस्त अतिक्रमणधारकांच्या आयुक्तांना वाकुल्या !

बेशिस्त अतिक्रमणधारकांच्या आयुक्तांना वाकुल्या !

Next

कारवाई संशयाच्या भोवऱ्यात : वाहतुकीचा खेळखंडोबा
अमरावती : दिवसेंदिवस वाढत चाललेला बकालपणा, गिळंकृत करण्यात आलेले पदपथ आणि बेशिस्त अतिक्रमणाने शहराचा ‘चेहरा’ काळवंडत चालला आहे. यावर वारंवार उपायोजनांचा रतीबही घातला जातो; तथापि दोन-चार दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने अतिक्रमणाधारकांना फूस कुणाची, असा प्रश्न निर्माण होतो. शहरातील बेशिस्त अतिक्रमणधारक तर थेट आयुक्तांनाच वाकुल्या दाखवीत असल्याचा प्रकार आता वारंवार घडू लागला आहे.
१४ एप्रिलला म्हणजे सुटीच्या दिवशी ‘चार्ज’ घेऊन आयुक्त गुडेवार यांनी महापालिका यंत्रणेला ‘रिचार्ज’ केले. सुरुवातीलाच त्यांनी अतिक्रमणधारकांविरोधात मोर्चा उघडला. अनेक सकारात्मक बाबी घडू लागल्या. निद्रिस्त अतिक्रमण विभागाला खडबडून जाग आली. वर्षभरापासून दर आठवड्यात शहरातील विविध भागात झालेले अतिक्रमण हटविले जाते. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे काम इथपर्यंत सुरळीत आणि सकारात्मक आहे. मात्र, त्यानंतर ते अतिक्रमण लगेच पुन्हा थाटले जात असल्याने काही प्रश्न उपस्थित होत आहेत. भलामोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण निर्मुलन पथक अतिक्रमणावर गजराज फिरवते, साहित्य जप्त केले जाते, प्रसंगी फौजदारी कारवाई देखील केली जाते. या कारवाईला न जुमानता लगेच त्याच भागात पुन्हा हातगाड्या लागत असतील तर संशयाला पुरेसा वाव आहे. काही अतिक्रमणधारक तर महिन्याला ‘बिदागी’ देतो म्हणून हातगाडी लावण्याचे धाडस करतो, असे खुलेआम सांगतात. फौजदारी कारवाईनंतरही हातगाड्या पुन्हा लागत असतील तर ते महापालिका यंत्रणेला जुमानत नसावे किंवा त्यांच्यावर जबरदस्त ‘वरदहस्त’ असावा, अशा दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. ‘पारदर्शक आणि डॅशिंग’ अशी प्रतिमा असलेल्या गुडेवारांकडून अमरावतीकरांच्या भरपूर अपेक्षा आहेत. (प्रतिनिधी)

या ठिकाणी होते वारंवार अतिक्रमण
गांधी चौक, बापट चौक, शाम चौक, नगरवाचनालय, चित्रा चौक, इतवारा बाजार रोड, टांगापाडाव चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, बसस्थानक परिसर, रुख्मिणीनगर रोड, मजीप्रा संरक्षणभिंत, वाहतूक शाखा कार्यालय परिसर, पोलीस आयुक्तालय परिसर, आरटीओ परिसरात अतिक्रमण होते.

मुजोर अतिक्रमणाचे प्रातिनिधिक उदाहरण
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संरक्षण भिंतीजवळ भजी व तत्सम खाद्यपदार्थ विकणाऱ्या दोघांवर गणेश कुत्तरमारे आणि टीमने वारंवार कारवाई केली. प्रसंगी फौजदारीही दाखल केली. अतिशय धोकादायक पद्धतीने व्हॅनमधून दोन भजीविक्रेते येथे दररोज अतिक्रमण करतात. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता हे भजीविक्रेते कुत्तरमारेंसह आयुक्तांनाही वाकुल्या दाखवीत असल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.

Web Title: Unconscious encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.