मोर्शीच्या जयस्तंभ चौकात अनियंत्रित वाहतूक
By admin | Published: April 25, 2016 12:17 AM2016-04-25T00:17:21+5:302016-04-25T00:17:21+5:30
जयस्तंभ चौकातील अनियंत्रित आणि अवैध आॅटोरिक्षा थांब्यामुळे एका लघु उद्योगाला आपला धंदा करणे अत्यंत कठीण झाले असून
आॅटोरिक्षांची डोकेदुखी : लघुउद्योजक त्रस्त, अनियंत्रित वाहतुकीला जबाबदार कोण ?
अजय पाटील मोर्शी
जयस्तंभ चौकातील अनियंत्रित आणि अवैध आॅटोरिक्षा थांब्यामुळे एका लघु उद्योगाला आपला धंदा करणे अत्यंत कठीण झाले असून यासंदर्भात वारंवार तक्रार केल्यावरही आॅटोरिक्षांचा थांबा मात्र हलविला गेला नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या या लघु उद्योजकांसमोर अखेर न्याय कोणाकडे मागावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वी दूरभाष केंद्रासमोर आणि जयस्तंभ चौकात मुतारीजवळ आॅटोरिक्षांचा थांबा होता. मात्र त्यानंतर आॅटोरिक्षाचालकांनी जयस्तंभ चौकातील प्रिंटिंग प्रेस ते जिजाऊ कॉम्प्लेक्सपर्यंत रस्त्यावर चक्क दुकानांसमोर आॅटोरिक्षा लावणे सुरू केले. यासंदर्भात वेळीच उपविभागीय पोलीस, जनता संपर्क समिती आणि वेळोवेळी होणाऱ्या शांतता समितीच्या सभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात येऊन हा अवैधरीत्या सुरूझालेला आॅटोरिक्षा थांबा हलविण्याविषयी आणि लक्षावधी रुपये खर्च करून दुकानदारी करणाऱ्यांना न्याय देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. संबंधित दुकानदारांनीसुध्दा पोलीस ठाणे आणि महसूल विभागाकडे तक्रारी आणि निवेदने दिली. तथापि हा अवैध थांबा हलविल्या गेला नाही.
याच रस्त्याच्या बाजूला नरेंद्र इंजिनिअरिंग वर्क्स हा कारखाना जिल्हा उद्योग केंद्राच्या आर्थिक सहकार्यातून नरेंद्र गोहाड यांनी कित्येक वर्षांपूर्वी सुरू केला. आॅटोरिक्षा आता त्यांच्याही दुकानासमोर अव्याहतपणे उभे ठेवण्यात येत असल्यामुळे त्यांच्या कारखान्यात येणाऱ्या मालवाहू ट्रक ट्रॅक्टरमधून त्यांना माल उतरविताना कसरत करावी लागत आहे. आॅटोरिक्षा चालकांना विनंती केल्यावर त्यांच्याशी आॅटोरिक्षाचालक वाद घालतात. अशाच वादामुळे आॅटोरिक्षाचालकां सोबतच गोहाड यांच्यावर पोलिसात प्रकरण दाखल झाले आहे.
आॅटोरिक्षा चालकांविषयी पोलिसांची ‘सहेतुक’ सहानुभूती दिसून येते. स्वत:च्या धंद्यासाठी दुकानदारांच्या दुकानांसमोर आॅटोरिक्षा लावून दुकानदारांचा धंदा चौपट करण्याची आॅटोरिक्षाचालकांची भूमिका ही योग्य नाही. पोलिसांशी आॅटोरिक्षाचालकांचे ‘मधुर’ संबंध असल्यामुळे त्यांच्याविरुध्द कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. थातूर मातूर कारवाई केल्यावर आॅटोरिक्षा चालक, संघटनेच्या बळावर पोलिसांनासुध्दा वेठीस धरण्याची भूमिका निभावतात. त्याला सत्ताधाऱ्यांचीही साथ मिळते. या सर्व भूमिकेमुळे आॅटोरिक्षाचालकांची मग्रुरी वाढलेली आहे.
वास्तविक धावणाऱ्या अनेक आॅटोरिक्षांचे आरटीओ परवाने नाहीत. अनेक आॅटोरिक्षे स्वत:च्या नावावर सुध्दा नाहीत. चालकांकडे बॅच क्रमांक नाही. गणवेष तर कधीही दिसत नाही. निर्धारित क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त संख्येने प्रवासी वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत केली जाते.