वीज कंपनीतील कामे बेरोजगार अभियंत्यांना

By admin | Published: April 5, 2015 12:33 AM2015-04-05T00:33:51+5:302015-04-05T00:33:51+5:30

वीज कंपनीतील देखभाल व दुरूस्तीची कामे लॉटरी पद्धतीने थेट सुशिक्षित बेरोजगार वीज अभियंत्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Unemployed Engineers | वीज कंपनीतील कामे बेरोजगार अभियंत्यांना

वीज कंपनीतील कामे बेरोजगार अभियंत्यांना

Next

शासन निर्णय : बेरोजगार अभियंत्यांना दिलासा
अमरावती : वीज कंपनीतील देखभाल व दुरूस्तीची कामे लॉटरी पद्धतीने थेट सुशिक्षित बेरोजगार वीज अभियंत्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणीही केली जाणार आहे.
सध्याच्या स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत इमारती, रस्ते तसेच वीज विभागाची विविध कामे बेरोजगार अभियंत्यांकडून केली जातात. यानुसारच महाराष्ट्र राज्य वीज कंपनीच्या तिन्ही विभागामधील देखभाल व दुरूस्तीची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिली जाणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणेच सुशिक्षित बेरोजगार वीज अभियंत्यांचा प्रथम नोंदणीचा वर्ग ब १ असा राहील. त्यांना विजेची कामे वाटपाची एकूण मर्यादा ५० लाखांपर्यंतची असून प्रत्येक कामाची कमाल मर्यादा १० लाख रूपये इतकी आहे. याबाबतचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून २६ मार्च रोजी याबाबत अध्यादेश जारी झाला आहे.

जिल्हास्तरीय समिती करणार निवड
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे वाटप करण्यासाठी महावितरण, महापारेषणचे कार्यालय असल्यास अधीक्षक अभियंता आणि महानिर्मितीशी संबंधित निर्मिती केंद्राची कामे असल्यास मुख्य अभियंता हे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. या समितीत सदस्य सचिव संबंधित कार्यालयातील कार्यकारी अभियंता राहणार आहेत. याशिवाय समितीत इतर तीन सदस्यांचा समावेश आहे. या समितीमार्फतच बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामे वितरित केले जाणार आहेत.
दुसऱ्या वर्षी ७५ लाखांची कामे
वीज कंपनीतील दुरूस्तीचे कामे सुशिक्षित बेरोजगारांना लॉटरी पद्धतीने देण्यात येणार आहेत. त्यानुसार विभागांतर्गत एकूण पार पाडावयाचा वार्षिक कामांपैकी सरासरी ५० टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या बेरोजगार अभियंत्यांनी पहिल्या वर्षात मिळालेली दहा लाखांची कामे मुदतीत पूर्ण केली, त्यांना दुसऱ्या वर्षी पंधरा लाख रूपयांपर्यंतची वार्षिक पाच कामे अशी एकूण ७५ लाख रूपयांची कामे लॉटरी पद्धतीने देण्यात येतील.

Web Title: Unemployed Engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.