बेरोजगारांची संख्या वाढली, ५१ग्रामपंचायतींमध्ये रोहयो निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:46+5:302021-06-09T04:15:46+5:30
जिल्ह्यातील चित्र; ५९ ग्रामपंचायतीत शून्य खर्च अमरावती : जिल्ह्यातील ८४० पैकी ५१ ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ...
जिल्ह्यातील चित्र; ५९ ग्रामपंचायतीत शून्य खर्च
अमरावती : जिल्ह्यातील ८४० पैकी ५१ ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एकही काम सुरू नाही, तर ५९ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांवर शून्य पैसे खर्च करण्यात आले आहेत. एकीकडे कोराेना विषाणूच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे बेरोजगार झालेल्यांना गावातच रोजगाराची संधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. असे असताना जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ५१ ग्रामपंचायतींमध्ये आजघडीला रोहयोचे एकही काम सुरू नसल्याचे वास्तव आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ८ जून रोजी ८४० पैकी ६५१ ग्रामपंचायतींच्या हद्दीत रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. यामध्ये घरकुल, वृक्षारोपण, फळबाग लागवड, रोपवाटिकेची कामे, जलसंधारण, शेततळे, समतल चर खोदणे, बंधाऱ्याची कामे यांचा समावेश आहे. ६५१ ग्रामपंचायतीमध्ये ३ हजार ११५ कामांवर ५३ हजार ३१४ मजुरांची उपस्थिती होती. अशातच १४ तालुक्यांमधील ५१ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू नाही. ५९ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांवर शून्य पैसे खर्च करण्यात आला आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यातील १२, धामणगाव रेल्वे ११, अचलपूर ६, चांदूर रेल्वे ५, मोर्शी ४, तिवसा ४, भातकुली ३, दर्यापूर ३, नांदगाव खंडेश्वर ३, चांदूर बाजार २, चिखलदरा २, वरूड २, अंजनगाव सुर्जी १ व धारणी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पावसाळा सुरू होत असल्याने आता या ग्रामपंचायती रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणार तरी कधी, हा खरा प्रश्न आहे.
बॉक्स
रोहयोवर शून्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती -५९
बाॅक्स
तालुकानिहाय काम सुरू न केलेल्या ग्रामपंचायती
अचलपूर -४
अमरावती - ७
अंजनगाव सुर्जी - १
भातकुली -५
चांदूर रेल्वे -३
चांदूर बाजार -१
चिखलदरा - २
दर्यापूर - ३
धामणगाव रेल्वे -१०
धारणी -४
मोर्शी २
नांदगाव खंडेश्वर-४
तिवसा-४
वरूड-१
बॉक्स
सरपंच काय म्हणतात..?
कोट
कोरोनाकाळात ग्रामीण भागात उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. अशावेळी रोजगार हमी योजना संजीवनी ठरू शकते, मात्र मागील दोन वर्षांपासून गावातील अनेक मजुरांच्या हाताला काम नाहीत. कामे देण्यासाठी समन्वयातून प्रयत्न केले जातील.
सत्यभामा कांबळे, सरपंच, जळगाव आर्वी
कोट
रोजगार हमी योजना मुळात गरीब व गरजूंसाठी राबविले जाते. गावात कामे मंजूर आहेत. मात्र, ही कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. आता पावसाळ्याला सुरुवात झाल्यावर वृक्षारोपणाची कामे सुरू करून मागेल त्याला रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
सविता उईके, सरपंच, आजनगाव
बॉक्स
हाताला काम नाही अन रोहयो नाही!
कोट
कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊनमुळे शहरात कामाला जाता येत नाही. गावात हाताला काम नाही. जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे. आतातरी आमच्या हाताला काम द्यावे, जेणकरून उदरनिर्वाह करण्यास मदत होईल.
प्रफुल नेहारे, मजूर
वृक्षारोपणाचे काम आठ महिन्यांपूर्वी सुरू होते. कामाचे मस्टर निघाले नाही. पांदण रस्त्याचे काम सुरू करायला पाहिजे होते, रोजगार मिळाला असता. मात्र, ही कामे सुरू झाली नाही. उसनवारी घेऊन आता कुटुंबाचा संसार चालवावा लागतो.
भगवान सांदेकर, वकनाथ
कोट
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ हा दृष्टिकोन ठेवून मनरेगाची अंमलबजावणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर यांच्या समृद्धीसाठी सदर योजना बांधावर पोहचविण्यात आली आहे. मागेल त्याला रोहयोतून कामे देऊन राेजगारही उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे.
राम लंके, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभाग