अभूतपूर्व अनागोंदीला सत्ताधीश, आयुक्त जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:55 PM2018-02-12T22:55:07+5:302018-02-12T22:55:29+5:30
महापालिकेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच शहरात अभूतपूर्व अनागोंदी माजली. त्यास सत्ताधीश व आयुक्त हेमंत पवार पूर्णत: कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिकेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच शहरात अभूतपूर्व अनागोंदी माजली. त्यास सत्ताधीश व आयुक्त हेमंत पवार पूर्णत: कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला. विरोधीपक्षनेता बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापौरांना जाब विचारला. आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. वर्षभरानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच जोरदार आंदोलन केले.
काँग्रेसने सोमवारी राजकमल चौकात पकाडे तळून भाजप सरकारचा निषेध केला.तथा गत एक वर्षात शहरातील विकासकामे ठप्प होण्यास भाजपसह प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्तांना जबाबदार धरले. तेथे निदर्शने केल्यानंतर काँगे्रसी कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनासमोर आले. मात्र आ.सुनील देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीसाठी आयुक्त विश्रामगृहात गेल्याने बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी संताप व्यक्त करीत आयुक्त जाणूनबुजून गेल्याचा आरोप केला. आयुक्तांना जाब न विचारता हे आंदोलक महापौरांकडे पोहोचले. तेथे वादळी चर्चा झाली.
सभागृह नेता सुनील काळे व विलास इंगोले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. भाजपचा निषेध करीत अश्वासनपूर्ती करा, अन्यथा खुर्ची खाली करा, असा इशारा देण्यात आला. काँग्रेसच्या या आंदोलनाने महापालिकेत बºयाच कालावधीनंतर मोठे आंदोलन पाहावयास मिळाले. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, नगरसेवक प्रशांत डवरे, माजी महापौर वंदना कंगाले, प्रदीप हिवसे, शोभा शिंदे, सलिम बेग आदीं नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेस आक्रमक, महापौर निरुत्तर
वर्षभरानंतरही स्वच्छतेच्या एकल कंत्राटावर सत्ताधीश तसेच आयुक्त निर्णय घेऊ शकले नाहीत, त्यासाठी आवश्यक असलेल्या ३२ कोटींचे कुठलेही नियोजन नाही. पीएमआवास योजनेत पीआरकार्डची जाचक अट टाकल्याने आतापर्यंत एक वीटही लागू शकली नाही. रमाई आवास योजनेच्या हप्त्यासाठी लाभार्थी महापालिकेच्या चकरा मारत आहेत. मजीप्राने संपूर्ण शहर खोदून ठेवले आहे. त्यांच्यावर महापालिकेचे कुठलेही नियंत्रण नाही. एवढेच काय तर प्रशासनावर भाजपचा वचक राहिलेला नाही. भटकी कुत्री अमरावतीकरांच्या जीवावर उठली आहे. या मुद्यावर काँगे्रसने महापौर संजय नरवणे यांना जाब विचारला. मात्र, महापौर सकारात्मक उत्तरे देऊ शकली नाहीत.