अभूतपूर्व... दर्शक आत, बाहेर खाकीचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:57 AM2018-01-26T00:57:54+5:302018-01-26T00:58:16+5:30
‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करून समस्या निर्माण करू नका, अशी तंबी थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. शहरातील सहा चित्रपटगृहांत नऊ स्क्रीनवरून हा चित्रपट दाखविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करून समस्या निर्माण करू नका, अशी तंबी थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. शहरातील सहा चित्रपटगृहांत नऊ स्क्रीनवरून हा चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी या सातही चित्रपटगृहांच्या आत दर्शक आणि बाहेर पोलिसांचा खडा पहारा असे अभूतपूर्व चित्र पाहायला मिळाले.
चित्रा चित्रपटगृह आणि राजकमल चौकात राजपूत सेनेच्या काहींनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एकंदर पोलिसांनी चित्रपटगृहांना संरक्षण दिल्याने आंदोलनकर्ते निदर्शनापुरते मर्यादित झाले. आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बंदोबस्ताची कमान सांभाळल्याने पोलिसांनी चित्रपटगृहांबाहेर खडा पहारा दिला.
सकाळी ११ वाजताच पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी सातही चित्रपटगृहांबाहेर मोर्चा सांभाळला. बिग राजेशसमोर अधिक मोठा खुला परिसर असल्याने तेथे आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन बॅरिकेट्स लावण्यात आले. चित्रा वगळता अन्य चित्रपटगृहांकडे आंदोलनकर्ते फारसे फिरकले नाहीत. चित्रपटावर उड्या घेणाऱ्यादर्शकांचीही कसून चौकशी करण्यात आली.
सीपी इन थिएटर!
चित्रपटाला संभाव्य विरोध लक्षात घेता, आयुक्त मंडलिक यांनी बुधवारीच सुरक्षेचा आढावा घेतला. गुरुवारीही ते उपायुक्त शशिकांत सातवसह सकाळी ११ च्या सुमारास चित्रा, सरोज, प्रिया, प्रभात, बिग राजेश व ई-आॅर्बिटला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. चित्रपटगृहांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या ठाणेदारांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश त्यांनी दिले. रात्रीच्या खेळावेळीही ३०० च्या वर कर्मचारी तैनात असल्याने अप्रिय घटना घडली नाही.