अमरावती महापालिकेवर आलेल्या जप्तीची नामुष्की टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:27 AM2018-02-08T11:27:39+5:302018-02-08T11:28:15+5:30
संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका प्रशासनावर आलेली जप्तीची नामुष्की बुधवारी टळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका प्रशासनावर आलेली जप्तीची नामुष्की बुधवारी टळली. सुमारे ३३ लाख रुपयांचा मोबदला घेण्यासाठी येथील यादव परिवारातील सदस्य बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिकेत आले. जप्ती वॉरंट घेऊन आलेले न्यायालयाचे बेलिफ पी.आर.राऊत हे त्यांच्यासमवेत होते. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्या रकमेचा धनादेश द्यावा, अशी भूमिका बेलिफ यांच्यासह यादव कुटुंबातील गीता यादव यांच्यासह अन्य सदस्यांनी घेतली. प्रशासनाच्यावतीने आयुक्त हेमंत पवार आणि विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनी चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्याकडून एक महिन्याची मुदत मागितली. यादव कुटुंबाने महिनाभर थांबण्याची भूमिका घेतल्याने पुढील पेचप्रसंग टळला.
अकोली बायपास या रस्त्यासाठी सन २००४ मध्ये शासनाकडून भूस्ंपादन करण्यात आले होते. तो रस्ता सार्वजिनक बांधकाम विभागाचा असला तरी संपादित प्राधिकरण महापालिका होते. त्या पार्श्वभूमिवर वाढीव मोबदला मिळण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा चालविला असून, त्यासाठी एक महिन्याची मुदत आवश्यक असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केल्यानंतर महापालिकेवर आलेली जप्तीची नामुष्की टळली. येथील दुसरे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयाच्या आदेशानुसार उमाकांत बैजनाथ यादव यांचे कुटुंब ३३, २६, २४९ रुपयांचा मोबदला घेण्यासाठी महापालिकेत पोहोचले होते. न्यायालयाचे बेलिफ जंगम जप्ती वॉरंट घेऊन पोहोचल्याने महापालिकेत मोठी खळबळ माजली होती.