केंद्रीय मंत्र्यांचे दत्तकग्राम आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 09:58 PM2018-10-05T21:58:36+5:302018-10-05T21:59:15+5:30
अमरावती शहरापासून २१ किलोमीटर अंतरावर असणारे तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेले टिमटाळा हे गावच साथरोगाने आजारी पडले आहे. त्यात दोन डेंग्यूरुग्ण आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये आहेत.
श्यामकांत सहस्त्रभोजने।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती शहरापासून २१ किलोमीटर अंतरावर असणारे तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेले टिमटाळा हे गावच साथरोगाने आजारी पडले आहे. त्यात दोन डेंग्यूरुग्ण आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये आहेत.
स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे जन्मगाव तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे सांसद आदर्श दत्तकग्राम टिमटाळा साथरोगाने ग्रस्त आहे. गेल्या एक महिन्यापासून या गावाला साथरोगाने घेरले आहे. त्यात डेंग्यूने शिरकाव केला आहे. ज्ञानेश्वर भडके व रोशन बगाडे यांचे रक्ताचे नमुने सकारात्मक आले आहेत. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख इस्पितळात उपचार घेतले. डेंग्यूरुग्ण संख्येत अधिक वाढ होवू शकते, अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे. अशा गंभीर स्थितीतदेखील आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष आजाराची व्याप्ती वाढवित आहे.
गावात केवळ एकदा फवारणी करण्यात आली. मात्र, ठिकठिकाणी घाणच घाण साचली आहे. आरोग्य प्रशासनाने आमच्या गावाची दखल घ्यावी, असे गावकऱ्यांमध्ये कळकळीने बोलले जात आहे.
वाहता नाला झाला अवरुद्ध
गावाला खेटून जाणारा वाहता नाला खोलीकरणामुळे अवरुद्ध झाला आहे. एकाच ठिकाणी साचून राहणाºया घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत चालली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नाल्याचे घाण पाणी गावात शिरत आहे.
सदस्यांच्या घरासमोरच शेणाचा ढिगारा
टिमटाळ्याचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरच शेणाचा भलामोठा ढिगारा आहे. या ढिगाºयामुळे डासांचा प्रादुर्भाव सतत राहतो. संबंधित ग्रामसेवकाला हा शेणाचा ढिगारा दिसत नाही का? गावाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामसेवक व जिल्हा परिषद प्रशासन ढिगारा संगळणाºयावर कारवाईल करेल का?
स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आमच्या गावात साथरोगाने थैमान घातले आहे. माझ्या मुलाला डेंग्यू झाला आहे. तो उपचार घेत आहे.
- उत्तम भडके, गावकरी
साथरोगाची सुरुवात होऊन एक महिना झाला. तेव्हाच ग्रामपंचायतला स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे गावकºयांनी सांगितले होते. आता तरी ठोस उपाययोजना राबवावी.
- श्रीपाल सहारे, गावकरी