जगावेगळा उड्डाणपूल पीडब्ल्यूडीनेही मिटले डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:42 PM2017-12-20T23:42:23+5:302017-12-20T23:43:16+5:30
इर्विन ते राजापेठ पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील गतिरोधकावर भरधाव कारची धडक दुचाकीला लागली.
वैभव बाबरेकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : इर्विन ते राजापेठ पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील गतिरोधकावर भरधाव कारची धडक दुचाकीला लागली. दुचाकीस्वार सुरक्षा कठड्यावर आदळल्याने सुदैवाने बचावला. मंगळवारच्या या घटनेनंतर उड्डाणपुलाच्या तंत्रशुद्धी देखभालीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शहरातील हा उड्डाणपूल जगावेगळा आहे. या पुलावर दोन ठिकाणी स्पीडब्रेकर्स आहेत. आता रोड डिव्हायडर निर्मितीचेही काम सुरू करण्यात आले आहे. या दोन बाबी असणारा हा बहुदा जगातील पहिलाच उड्डाणपूल ठरावा.
पूर्वी हा उड्डाणपुल बेवारस स्थितीत होता. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) उड्डाणपुलाच्या जबाबदारी झटकत होते. याबाबत 'लोकमत'ने 'बेवारस उड्डाणपूल' हे वृत्त प्रकाशित करून दोन्ही विभागांचा भोंगळ कारभार लोकदरबारी मांडला. 'लोकमत'च्या पाठपुराव्यामुळे उड्डाणपुलाची जबाबदारी पीडब्ल्यूडीने स्वीकारली.
जबाबदारी स्वीकारली असली तरी पालकत्त्वाचे कुठलेही कर्तव्य या उड्डाणपुलाबाबत पीडब्ल्यूडीने पार पाडलेले नाही. उड्डाणपुलावर कचरा आणि माती साचली आहे. रेती, गिट्टी, विटा हेदेखील पुलावर बघता येतात. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दिसेनासे झाले आहेत. दिशादर्शक फलक कोलमडून पडले आहेत. अमरावतीत येणाºया बाहेरगावच्या नवख्या वाहनचालकांना उड्डाणपुलावर असलेल्या गतिरोधकांचा अंदाजच येत नाही. त्यामुळे अपघाताची श्रृंखला सुरूच आहे. बरेचदा ऐनवेळी गतिरोधक दिसल्याने वाहनचालक करकचून ब्रेक दाबतात आणि मागून येणारी वाहने पहिल्या वाहनावर धडकतात. मंगळवारी दुपारी घडलेला अपघातसुद्धा याच पद्धतीचा आहे. इर्विनकडे निघालेले दुचाकीस्वार अमोल विश्वनाथ वाकोडे (४१, रा. गोपालनगर) यांनी गतिरोधकावर गती कमी केली आणि एमएच ४० बीजी-०२८० या क्रमाकांचे वाहन दुचाकीला मागून धडकले. अमोल फेकले गेले व उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळले. अपघातानंतर कारचालक पसार झाला. उड्डाणपूल सोईसाठी की मृत्यूसाठी याचे उत्तर पीडब्ल्यूडीनेच शोधायचे आहे.
उड्डाणपुलावर झेब्रा क्रॉसिंग दिसेनासे झाले आहेत. दिशादर्शक नाहीत. त्यामुळे बाहेरगावातून शहरात येणारे वाहनचालक संभ्रमात पडतात. अशाप्रसंगी अपघात घडतात.
- दिलीप पाटील,
ठाणेदार, कोतवाली.
उड्डाणपुलाच्या देखभालीची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच आमच्याकडे आली. निविदा प्रक्रिया होताच कामे सुरू होतील. उड्डाणपुलाला लवकरच वेगळे स्वरूप येईल.
- सदानंद शेंडगे, कार्यकारी अभियंता, साबांवि