धारणी शहरात आज सर्वधर्मीय बंद
By Admin | Published: January 1, 2016 12:43 AM2016-01-01T00:43:48+5:302016-01-01T00:43:48+5:30
अल्पवयीन आदिवासी मुलींवर १६ डिसेंबर रोजी झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी
धारणी : अल्पवयीन आदिवासी मुलींवर १६ डिसेंबर रोजी झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धारणी शहरात सर्वपक्षीय बंद ठेवून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.
यासंदर्भात गुरूवारी पार पडलेल्या सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला. या बंद व मूकमोर्चामध्ये सर्वधर्मीय समाजबांधव सहभागी होणार आहेत. भविष्यात अशा घटना घडू, नये यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात गुरुवारी सर्वपक्षीय सभा पार पडली. यामध्ये आ. प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार राजकुमार पटेल, हिरालाल मावस्कर, शाजीद शेख, हाजी कईम शेठ, मजीद सौदागर, मोतीलाल कास्देकर, राजू मालवीय, हरेराम मालविय, आप्पा पाटील, आदींनी मार्गदर्शन केले.
या सभेत शहरात घडलेले गैरकृत्य पुन्हा घडू नये यासाठी सर्व पक्ष व सर्व धर्मीयांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून शुक्रवारी शहरात मूकमोर्चा काढला जाणार आहे. हा धारणी येथील बाजाराचा दिवस आहे व शहर बंदचे आवाहन करण्यात आल्याने पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे.या बंदला धारणीकर जनतेने आपली दुकाने, प्रतिष्ठान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून मूकमोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन सर्व पक्षीय नेत्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)