विद्यापीठाला ‘नॅक’ मूल्यांकनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:59+5:302021-07-20T04:10:59+5:30
कॉमन अमरावती : कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अद्यापही शहरी भागातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ...
कॉमन
अमरावती : कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अद्यापही शहरी भागातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडे (नॅक) ऑनलाईन एसएसआर पाठविला असतानाही मूल्यांकनासाठी चमूची तारीख मिळत नसल्याचे वास्तव आहे. ऑगस्ट महिना उजाडण्यास काही दिवस शिल्लक असून ‘नॅक’ होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कोरोनाचा शैक्षणिक क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून बहुतांश विद्यापीठांचे ‘नॅक’ मू्ल्यांकन रखडले आहे. यापूर्वी ‘नॅक’ मूल्यांकन जुलैअखेर होईल, असे संकेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून मिळत होते. मात्र, जुलै संपण्यास केवळ १० दिवस बाकी असताना नॅक चमूची तारीख मिळाली नाही, अशी माहिती आहे. विद्यापीठाने सेल्फ स्टडी रिपोर्ट (एसएसआर) ऑनलाईन पाठवून बराच काळ लोटला आहे. दर पाच वर्षांनी विद्यापीठांना ‘नॅक’ मूल्यांकन बंधनकारक आहे. त्याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चमूकडून हे मूल्यांकन केले जाते.
तत्पूर्वी, शैक्षणिक संस्थांना दिल्ली येथे विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ऑनलाईन एसएसआर पाठवावा लागतो. त्यानुसार ७० टक्के कागदपत्रे रवाना झाली असून, ३० टक्के कामे चमू तपासणार आहे. मात्र, मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आजतागायत तो कायम आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाचे डिसेंबर २०२० मध्ये होणारे ‘नॅक’ मूल्यांकन सात महिन्यांनंतरही होऊ शकले नाही.
------------------------
‘नॅक’ची चमूकडून केवळ ३० टक्के पाहणी होणार
अमरावती विद्यापीठाने ‘नॅक’संदर्भात कागदोपत्री अहवाल यूजीसीकडे पाठविला आहे. आता केवळ ३० टक्के तपासणीची कामे शिल्लक आहेत. यात प्रत्येक विभागाचे सादरीकरण, विद्यापीठात पायाभूत सुविधा, सामाजिक उत्तरदायित्व, चमूकडून विद्यार्थ्यांशी संवाद, माजी विद्यार्थ्यांची कर्तव्यपूर्ती आदी बाबी ‘नॅक’ची चमू पाहणी करणार आहे.
----------
‘नॅक’ मू्ल्यांकनाची तयारी पूर्ण केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ऑनलाईन एसएसआरसुद्धा पाठविला आहे. आता केवळ ‘नॅक’ चमू कधी येणार, याबाबतच्या पत्राची प्रतीक्षा आहे.
- तुषार देशमुख, कुलसचिव, विद्यापीठ.