विद्यापीठ परिसरात बिबट; गाय फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:16 PM2018-12-27T22:16:07+5:302018-12-27T22:16:38+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याने गाय फस्त केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता निदर्शनास आली. घटनास्थळी मृत गाईचा पंचनामा करून वनविभागाने अवशेष ताब्यात घेतले आहे. विद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याने गाय फस्त केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता निदर्शनास आली. घटनास्थळी मृत गाईचा पंचनामा करून वनविभागाने अवशेष ताब्यात घेतले आहे. विद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठ सुरक्षा विभागाच्या माहितीनुसार, गाय मारल्याची घटना सकाळी ११ वाजता निदर्शनास आली. त्यानंतर सुरक्षा विभागाचे अधिकारी, रक्षकांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी गाईला अर्ध्यापेक्षा जास्त फस्त केल्याची दिसून आले. विद्यापीठ प्रशासनाने घटनेबाबत वनविभागाला कळविले. वनविभागाची चमू घटनास्थळी पोहचली. गाईला ज्या प्रकारे फस्त करण्यात आले, असे कृत्य कुत्र्यांचे असू शकत नाही, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या चमूने वर्तविली. तथापि घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले नाही. त्यामुळे गाय कोणी मारली, याबाबत घटनास्थळावरील खाणाखुणांवरून वनविभागाने स्पष्ट केले नाही. मात्र, अर्ध्यापेक्षा जास्त गाईला फस्त करण्याची बाब ही बिबटच करू शकतो.
घटनास्थळी मृत गाईचा पंचनामा करण्यात आला. गाईचे काही अवशेष वन विभागाने ताब्यात घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले जातील, अशी माहिती मिळाली आहे. मृत गाईचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी कुळकर्णी व वनरक्षक टिकले यांनी केला आहे.
बिबट्याने फस्त केलेली गाय ही नजीकच्या इंदला येथील रहिवाशाची आहे. विद्यापीठाच्या मागील बाजुस टेकडी परिसरात पशू चराईसाठी नियमित आणले जातात. त्याच भागात बिबट्यांचा संचार आहे. तृष्णा भागविण्यासाठी बिबट विद्यापीठ तलावाकडे येत असताना गाईची शिकार केल्याचा अंदाज विद्यापीठ सुरक्षा रक्षकांनी वर्तविला आहे. दरम्यान, या घटनेने विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली होती.
विद्यापीठ परिसरात पहाटेची रपेट धोकादायक
विद्यापीठ परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे यापूर्वीसुद्धा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात पहाटेची रपेट करणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन कुलसचिव अजय देशमुख यांनी केले आहे. तलाव परिसरात ये-जा करताना सजगता बाळगावी. विद्यापीठ परिसरातील मागील बाजूस फार लांब जाऊ नये. नागरिकांसह विद्यार्थ्यांनादेखील काळजी घेण्याबाबत त्यांनी कळविले आहे.
गाय फस्त झाल्याची घटना ही सकाळी १० ते ११ वाजताची आहे. दीड वाजता घटनास्थळी पोहचलो तेव्हा अर्ध्यापेक्षा गाय फस्त झाल्याचे दिसून आले. तिच्या अंगावर जखमा ताज्या होत्या. पंचनाम्याअंती मांस व अन्य अवशेष वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
- आर.जे. सयाम
सुरक्षा अधिकारी, विद्यापीठ
विद्यापीठात बिबट्याने गाय मारली आहे. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी पंचनाम्याअंती ही बाब स्पष्ट केली. मृत गाईचे अवशेष ताब्यात घेण्यात आले असून, तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाईल.
- अशोक कविटकर
सहायक वनसंरक्षक, अमरावती