विद्यापीठ परिसर वायफायने जोडणार
By Admin | Published: April 3, 2017 12:06 AM2017-04-03T00:06:23+5:302017-04-03T00:06:23+5:30
विद्यापीठ परिसरात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ आणि रिलायन्स-जीओ इन्फोकॉम लि. मुंबई या कंपनीशी शनिवारी करार झाला.
कुलगुरुंचा पुढाकार : रिलायन्स-जीओशी करार
अमरावती : विद्यापीठ परिसरात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ आणि रिलायन्स-जीओ इन्फोकॉम लि. मुंबई या कंपनीशी शनिवारी करार झाला. कुलगरू मुरलीधर चांदेकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठातर्फे कुलसचिव अजय देशमुख व जीओ कंपनीतर्फे उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम अय्यर यांनी स्वाक्षऱ्या केल्यात.
या करारांतर्गत विद्यापीठ परिसरात विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक व अधिकारी वाय-फायद्वारे मोफत डाटा वापरू शकतील. या करारांतर्गत २० एम.बी. डाटा दर दिवसी उपभोक्त्यास मोफत उपलब्ध असणार आहे. ज्यांचे थ्रीजी व टुजी मोबाईल हॅन्डसेट आहे, त्यांनाही हा डाटा वापरता येणार असल्यामुळे सर्वजण इंटरनेटने जोडले जातील. विद्यापीठ परिसरासह विद्यापीठाशी संलग्नित अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्यातील संलग्नित सर्व महाविद्यालयांना त्यांचा परिसर जीओ वायफायने मोफत जोडता येणार आहे. त्या महाविद्यालय व परिसरातील विद्यार्थी आणि सर्व शिक्षक, कर्मचारी यांना २० एम.बी. इंटरनेट डाटा प्रतिदिवस उपलब्ध असणार आहे.
कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने ही मोफत सुविधा विद्यापीठ परिसरात सर्वांकरीता लवकरच सुरु होत आहे.
अन्य महाविद्यालयांनाही संधी
अमरावती : याशिवाय विद्यापीठ परिक्षेत्र असलेल्या अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्यातील महाविद्यालयांना ही सुविधा घ्यावयाची असल्यास त्यांना घेता येईल. याबाबत महितीकरिता विद्यापीठाने केलेल्या कराराची प्रत विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. प्राचार्यांना याबाबत माहिती जाणून घेता येईल. तत्कालीन बीसीयूडी संचालक राजेश जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली या करारासाठी समिती गठित करण्यात आली होती. कराराप्रसंगी दिनेशकुमार जोशी, संजय डुडुल, विलास नांदूरकर, रामरतन जावळे, जीओ व्यवस्थापक प्राण पांडा, संदीप त्रिपाठी, आकाश पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)