विद्यापीठ लॅब परिसराला बॅरिकेडने वेढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:00 AM2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:01:10+5:30
आता केवळ विद्यापीठ लॅबला ‘आयसीएमआर’च्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्यात झालेल्या चर्चेनुसार विद्यापीठ प्रयोगशाळा परिसराला बॅरिकेडने वेढण्यात आल्याची माहिती आहे. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असले तरी काही प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवागमन कायम आहे. प्रयोगशाळा परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी हा परिसर बॅरिकेडने वेढण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोविड-१९ रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने चाचणीसाठी सुसज्ज प्रयोगशाळेच्या परिसराला बॅरिकेडने वेढण्यात आले आहे. दक्षता म्हणून नमुने तपासणीपूर्वीच हा परिसर मंगळवारी सील करण्यात आला. अकोला येथील सर्वोपचार रूग्णालय व नागपूरचे ‘एम्स’पेक्षाही विद्यापीठात नमुने चाचणीसंदर्भात अतिदक्षता बाळगली जात आहे.
विद्यापीठाची प्रयोगशाळा थ्रोट स्वॅब चाचणीकरिता सज्ज झाली आहे. गत आठवड्यापासून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नागपूरने विद्यापीठात प्रायोगिक तत्त्वावर ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीकरिता पाठविले आहे. या नमुन्यांचा अहवाल नियमितपणे विद्यापीठ ‘एम्स’कडे पाठवित आहे, तर दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) नमुने चाचणीच्या अनुषंगाने विद्यापीठात अद्ययावत सुविधा, मशीन, मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्रीची आॅनलाइन पाहणीसुद्धा केली आहे. आता केवळ विद्यापीठ लॅबला ‘आयसीएमआर’च्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्यात झालेल्या चर्चेनुसार विद्यापीठ प्रयोगशाळा परिसराला बॅरिकेडने वेढण्यात आल्याची माहिती आहे. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असले तरी काही प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवागमन कायम आहे. प्रयोगशाळा परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी हा परिसर बॅरिकेडने वेढण्यात आला आहे.
दर तासाला १२ नमुने तपासणीची क्षमता
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात फॅबलॅबमध्ये थ्रोट स्वॅब नमुने तपासणीकरिता अत्याधुनिक मशीन, यंत्रसामग्री मागविण्यात आली. ही मशीन स्वयंचलित असून, दर तासाला १२ नमुने तपासणीची क्षमता असल्याची माहिती आहे. थ्रोट स्वॅब नमुने तपासणीच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत सुविधा आहेत. प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे, प्रशांत गावंडे व त्यांची चमू अविरतपणे कार्यरत आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रयोगशाळा परिसर बॅरिकेडिंग करण्यात आला आहे. या भागात बाहेरील व्यक्तींनी प्रवेश करू नये, दक्षता म्हणून उपाययोजना केल्या आहेत. तशा प्रकारे गाइड लाइन वगैरे नाहीत.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू