विद्यापीठात प्राध्यापक पदोन्नतीत ‘फिक्सिंग’, सिनेट सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 01:43 PM2021-11-12T13:43:21+5:302021-11-12T13:52:49+5:30
सहायक प्राध्यापकांना प्राध्यापकाचा दर्जा देणाऱ्या समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फिक्सिंग’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अमरावती : सहायक प्राध्यापकांनाप्राध्यापकाचा दर्जा देणाऱ्या समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फिक्सिंग’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुटाचे अध्यक्ष सिनेट सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी याबाबत गौफ्यस्फोट केला. पुराव्यासह त्यांनी माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळातील समितीमधील हा घोळ पुढे आणला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा घेण्यात आली नव्हती; परंतु कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गुरुवारी सिनेटची सभा घेण्यात आली. या सभेत अनेक विषय चर्चेस आलेत; परंतु दुपारच्या सत्रात डॉ. अर्चना बोबडे यांनी मांडलेल्या प्रश्नावरून मात्र वादग्रस्त प्रकार पुढे आला. महाविद्यालयांकडून प्राध्यापक या पदाकरिता पदोन्नतीला मान्यता देणाऱ्या समितीमध्ये सहयोगी प्राध्यापक असल्याचे डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सभागृहात सांगितले.
प्राध्यापकपदासाठी मान्यता देण्यासाठी ४४ प्रस्ताव विद्यापीठाला पाठविण्यात आले होते. त्यापैकी १८ समित्यांमध्ये दोन सदस्य सहयोगी प्राध्यापक होते. प्रा. पी.आर. राजपूत सहयोगी प्राध्यापक असताना त्यांना समितीमध्ये का काढण्यात आले, असा प्रश्न प्रवीण रघुवंशी यांनी उपस्थित केला. याशिवाय प्रशांत निचनकर व यू.ई. चौधरी या दोघांना १८ समित्यांमध्ये तिसऱ्या व चौथ्या क्रमाकांचे सदस्य म्हणून नेमण्यात आले. दोन सदस्यांची वारंवार नेमणूक का करण्यात आली? असा प्रश्नही त्यांनी केला.
प्र-कुलगुरूंना मान्यता देण्याचा नियम कुठे?
प्रकुलगुरूंनी प्राध्यापकासाठी मान्यता द्यावी हा नियम कुठे आहे, असा प्रश्न करीत असल्यास तो दाखविण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. अमरावतीसह अकोला, बुलडाणा येथील महाविद्यालयांतील सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक म्हणून पदोन्नती देण्यासाठी गठित समित्यांमध्ये हा प्रकार घडला. त्यामुळे सदर गंभीर प्रकाराबाबत त्यांनी विद्यापीठाला जाब विचारला. चर्चेत प्रा.डॉ. मीनल ठाकरे, सिनेट सदस्य डॉ. बी.आर. वाघमारेदेखील सहभागी झाले.
समितीचे कार्य बेजाबदारपणे
प्राध्यापक पदोन्नती समितीमध्ये काही महाविद्यालयांत समिती येण्यापूर्वी त्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे समितीचे कार्य किती बेजबाबदारपणे झाले याची प्रचीती येत असल्याचे प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले.
सॉफ्टवेअरद्वारे होणार निवड
पदोन्नती समितीमध्ये यापुढे घोळ होऊ नये यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी सांगितले. यासाठी संगणक विभागाचे डॉ. ठाकरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.