विद्यापीठात पीएचडी प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:11 PM2019-02-01T23:11:03+5:302019-02-01T23:11:34+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी काही तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा या परीक्षेला मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. आता १५ मार्चपर्यंत परीक्षेची डेडलाईन असेल, असे सूत्रांनी सांगितले. ८१ संशोधन केंद्रांच्या तपासणीसाठी समितीदेखील नेमली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी काही तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा या परीक्षेला मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. आता १५ मार्चपर्यंत परीक्षेची डेडलाईन असेल, असे सूत्रांनी सांगितले. ८१ संशोधन केंद्रांच्या तपासणीसाठी समितीदेखील नेमली जाणार आहे.
यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने पीएचडी परीक्षेकरिता ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, यात काही अडचणी उद्भवल्या आहेत.
तसेच एमफीलधारक विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील अडसर तसेच नवीन संशोधन केंद्रांची नावे जाहीर करावयाची असल्याने या परीक्षेला मुदतवाढीचा निर्णय प्रस्तावित आहे. सिनेटमध्ये एमफीलधारक विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्याचे मान्य केल्याने ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येणारी प्रवेशाची मुदत वाढवून ३० जानेवारीपर्यंत करण्यात आली होती. तथापि, या कालावधीत ८१ संशोधन केंद्रांची तज्ञ्जांकडून पाहणी आणि तेथे सुविधांचा अहवाल प्राप्त करावयास बराच वेळ लागणार आहे. विद्यापीठाच्या पीएचडी सेलने कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आदींना सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे पीएचडीचे प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत वाढ मिळण्याचे संकेत आहे.
एमफीलच्या विद्यार्थ्यांना कोर्स वर्कमधून मिळेल सूट
विद्यापीठात अगोदर एमफीलची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशासाठी कोर्सवर्कमधून सूट देण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. अधिष्ठात्यांची समितीने त्यानुसार अहवाल सादर केला आहे. एमफीलच्या विद्यार्थ्यांना कोर्स वर्कमधून सूट देण्याबाबत प्रशासनाने शिक्कामोर्तब करताचा विद्यार्थ्यांना ही नियमावली लागू होईल.
नवीन संशोधन केंद्र जाहीर होण्याची शक्यता
मार्च आणि सप्टेंबर २०१८ मध्ये पेट परीक्षांचे निकाल लागले. त्यात अनुक्रमे ११५३ आणि ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या व्यतिरिक्त नेट-सेट आणि एमफील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील १०३ केंद्रांवर हे प्रवेश दिले जाणार असून, लवकरच काही नवीन संशोधन केंद्र जाहीर होण्याची शक्यता आहे.