विद्यापीठाचे संशोधन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:22 PM2018-10-07T22:22:27+5:302018-10-07T22:23:37+5:30
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मालकीची येथील रुख्मिणीनगरात जागा असून त्या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र उभारण्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपये निधी विद्यापीठाला मंजूर झाला असून, या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मालकीची येथील रुख्मिणीनगरात जागा असून त्या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र उभारण्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपये निधी विद्यापीठाला मंजूर झाला असून, या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वी शासनास सादर करण्यात आला होता. त्याकरिता आमदार तथा उपाध्यक्ष, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळ सुनील देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आमदार देशमुख यांनी सदर प्रस्तावास शासन दरबारी प्रयत्न करुन मान्यता मिळवून दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहे.
रुख्मिणीनगर स्थित पेट्रोल पंपाजवळील विद्यापीठाच्या मालकीच्या जागेवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरु व्हावे आणि त्याचा शहरातील अनेक विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी पुढाकार घेतला. त्याठीकाणी सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, सेमिनार हॉल, कार्यालय, क्युबिकल तसेच संशोधक विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था राहणार आहे. अत्याधुनिक सर्वसोयीने सुसज्ज ही इमारत चार मजली राहणार आहे. संशोधन आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ होणार आहे.
शहराच्या मध्यवस्तीत विद्यापीठाचे निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने मंजुरी व निधी दिल्याबद्दल शासन तसेच आमदार देशमुख यांचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपुरकर, कुलसचिव अजय देशमुख यांनी आभार मानले आहे.