परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठ म्हणते नापास! एम.एस्सी. विद्यार्थिनीपुढे वर्ष वाया जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:06 PM2019-04-25T20:06:25+5:302019-04-25T20:07:08+5:30
परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थिनीला बी.एस्सी.च्या अंतिम परीक्षेत नापास असल्याचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पाठविले आहे.
- गणेश वासनिक
अमरावती - बीएस्सी उत्तीर्ण झाल्याची विद्यापीठातून गुणपत्रिका मिळाली. त्याच्या आधारे एम.एस्सी. भाग-१ मध्ये प्रवेश घेतला. दिवसरात्र अभ्यास केला. आता परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थिनीला बी.एस्सी.च्या अंतिम परीक्षेत नापास असल्याचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पाठविले आहे. या अजब कारभारामुळे तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. दरम्यान, एम.एस्सी. अभ्यासक्रमाला प्रवेशित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तिचा प्रवेश रद्द करण्यास नकार देऊन तिला दिलासा दिला आहे.
श्रुती पुंडलिक कडू असे सदर विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ च्या उन्हाळी परीक्षेत बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षाच्या पेपरपैकी दोन 'बॅक' राहिले होते. श्रुतीने ते पुनर्मूल्यांकनाला टाकले असता, संगणकाच्या पेपरला २० ऐवजी २६ गुण मिळाले. त्यामुळे रसायनशास्त्राच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन रद्द करावे आणि मूळ गुण कायम ठेवून उत्तीर्ण गुणपत्रिका देण्यात यावी, असा अर्ज गोपनीय विभागात सादर केला होता. परंतु, या अर्जावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट विद्यापीठाने ३० आॅगस्ट २०१८ रोजी चार गुणांची वाढ देत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका दिली. यानंतर एम.एस्सी. (संगणक विज्ञान) प्रथम वर्षाला तिने स्थानिक ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रथम सेमिस्टरसुद्धा दिले. दरम्यान, विद्यापीठाने आता तांत्रिक अडचण पुढे करून तिला बी.एस्सी. अनुत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका घेऊन जावी, असे पत्राद्वारे कळविले आहे. रसायनशास्त्र पेपरच्या पुनर्मूल्यांकनात गुण कमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकारामुळे श्रुतीपुढे पेच निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी ५० हजार रुपये खर्च झाले. एम.एस्सी.चे पहिले सत्र आटोपले. दुसºया सत्राची परीक्षा अवघ्या काही दिवसांत आहे. अशात तिचा प्रवेश रद्द झाल्यास, आर्थिक आणि शैक्षणिक वर्षाचे नुकसानास तिला सामोरे जावे लागणार आहे.
पुनर्मूल्यांकनात दोन विषय होते. त्यापैकी एका विषयात ती उत्तीर्ण झाली होती. एक विषय तसाच राहिला होता. काही तांत्रिक चुकीमुळे श्रुती कडू हिला उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका देण्यात आली. आता हा विषय परीक्षा व मूल्यांकन मंडळापुढे निर्णयार्थ ठेवला जाईल.
- राजेश जयपूरकर,
प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
बीएस्सी उत्तीर्ण गुणपत्रिकेच्या आधारेच श्रुती कडू हिला एम.एस्सी. प्रथम वर्षाला प्रवेश दिला. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने श्रृतीचा प्रवेश रद्द करण्याबाबत कळविले. मात्र, प्रवेश रद्द करता येणार नाही, असे विद्यापीठाला आम्ही कळविले आहे. श्रुतीचा एम.एस्सी. परीक्षा अर्ज विद्यापीठाने स्वीकारला नाही.
- एन.सी. बेलसरे, प्राचार्य, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती