विद्यापीठात विद्वत परिषदेतून सिकची, खाद्री तूर्तास ‘आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 09:57 PM2018-04-29T21:57:12+5:302018-04-29T21:57:25+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर (अॅकेडेमिक कौन्सिल) राज्यपालांचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेले प्राचार्य राधेशाम सिकची व एस.एफ.आर. खाद्री यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर (अॅकेडेमिक कौन्सिल) राज्यपालांचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेले प्राचार्य राधेशाम सिकची व एस.एफ.आर. खाद्री यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी चौकशी समितीच्या आधारे या दोघांनाही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबाबत राज्यपाल कोणता निर्णय घेतात, याकडे नजरा लागल्या आहेत.
अकोला येथील सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य राधेशाम सिकची व विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागप्रमुख एस.एफ.आर.खाद्री यांची फेब्रुवारी २०१८ मध्ये विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती. मात्र, विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख राजेंद्र प्रसाद यांनी या दोघांच्याही निवडीवर आक्षेप नोंदविला होता. त्याअनुषंगाने कुलगुरू चांदेकर यांनी के.एम. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली होती. या समितीने वस्तुनिष्ठ अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केला आहे. सिकची व खाद्री यांना वेगवेगळ्या प्रकरणात दंड आणि शिक्षा झाल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे कुलगुरूंनी याप्रकरणी राज्यपालांकडे मार्गदर्शन मागविले आहे. दरम्यान खाद्री, सिकची यांना विद्वत परिषदेतून विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या ६४ (एफ) अंतर्गत तूर्तास बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
प्राचार्य राधेशाम सिकची, एस.एफ.आर. खाद्री यांची राज्यपालांचे सदस्य म्हणून विद्वत परिषदेवर झालेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचे चौकशी अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. आता याबाबत राज्यपालांना निर्णय घ्यायचा असून, चौकशी अहवाल पाठविला आहे.
- मुरलीधर चांदेकर,
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ