विद्यापीठाचे एप्रिलचे वीज देयक शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:51+5:302021-05-09T04:13:51+5:30
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीने तसेच प्राधिकारिणींच्या मान्यतेनुसार विद्यापीठात सौरऊर्जा ...
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीने तसेच प्राधिकारिणींच्या मान्यतेनुसार विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्प डिसेंबर २०१८ मध्ये स्थापन करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत २०१८ ते २०२१ या कालावधीत १८.८७ लक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्यामुळे या सौरऊर्जा प्रकल्पातून विद्यापीठाची १ कोटी रुपयांची बचत झाली आहे. एप्रिल २०२१ चे विद्यापीठाला वीज वितरण कंपनीकडून आलेले वीज देयक शून्य रुपये आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा शून्य देयक आले असून, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या निर्णयामुळे विद्यापीठाच्या पैशाची बचत झाली आहे.
विद्यापीठात स्थापित झालेल्या सौर प्रकल्पाची क्षमता ५७६ केडब्ल्यूपी असून, विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्र, वनस्पतीशास्त्र, परीक्षा, बायोटेक्नॉलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व शिक्षण विभागाच्या मोठ्या इमारतींवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक विभागांना प्रतिवर्ष १४.३० लक्ष युनिट विजेची गरज असून, सौरऊर्जा प्रकल्पातून विद्यापीठाला प्रतिवर्ष ८.३५ लक्ष युनिट वीज प्राप्त होते. त्यामुळे विद्यापीठाच्या खर्चात ४८ लक्ष रुपयांची प्रतिवर्ष बचत झाली. सौर वीज वापरामुळे ६८५ टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन नियंत्रण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प असून, प्रदूषण कमी करण्यासाठी व पैसे बचतीसाठी विद्यापीठाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आणि इतरांना अनुकरणीय ठरला आहे.
सौरऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व अन्य सदस्य असलेली समिती गठित करण्यात आली. त्या समितीच्या मार्गदर्शनात कार्य करण्यात आले. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाची योजना असून, या प्रकल्पाला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली (भारत सरकारचा उपक्रम) ने मान्यता दिली आहे. सौरऊर्जा प्रकल्पाचे आयुष्य २५ वर्षे असून विद्यापीठाची नेहमीकरिता वीज बचत होणार असल्याने पर्यावरण संवर्धनासह बचतीचा पैसा विद्यापीठाच्या व पर्यायाने विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता कामी लागणार आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाद्वारे प्रकल्प कार्यान्वित करण्यापासून ते त्याची देखभालीसाठी सातत्याने परिश्रम घेतले जात आहे.